कामनची कमाई

थोड्याशा विलंबानेच गाडी धावत होती. वसईलाच मस्त इडली वड्याचा नाष्टा झाल्यामुळे सगळ्यांचे पोटोबा प्रसन्न होते. परंतु संपूर्ण भिवंडी दर्शन करूनही कामनचा पायथा काही येत नव्हता, म्हणून सगळ्यांचे GOOGLE MAPS चालू झाले होते. जुन महिन्याचा शेवटचा आठवडा असूनही म्हणावी तशी पावसाला सुरुवात झाली नव्हती.

तुंगारेश्वर जंगलास संपूर्ण वळसा घालून अखेरीस आम्ही कुहे गावांत पोहोचलो. एवढी मोठी गाडी घेऊन हे शहरांतले लोक इथे कशाला तडमडायला आलेत, याच अविर्भावात गावातली लोक आमच्याकडे पाहत होती. गडाच्या कमी प्रचलित बाजूने आम्ही जाणार असल्याने या मार्गाने सहसा कोणी येत नाही. डांबरी रास्ता जिथे संपतो तिथल्या झाडाकडे गाडी लावली. आधीच उशीर झाला असल्यामुळे घाईत ओळख परेड संपवली.

 डोंगरपल्याड कामन दुर्ग आणि ट्रेकपूर्वीचे क्षण   

 पाठीशी सॅक मारून पुन्हा गावाच्या मध्यभागी आलो. गावकरी गोट्याला OFFICIAL GUIDE ठरवून पुढचं मार्गक्रमण करायचं ठरलं. त्याने सोबत १ आणि पुढे गेल्यावर आणखी २ असं ३ जणांना हाताशी घेतलं. स्लीपर्स घालून लीड करणाऱ्या ह्या लीडर्स पाठोपाठ 'बऱ्यापैकी' ब्रँडेड शूज घालणाऱ्या आमच्या २३ जणांच्या चमूने कूच केले.

ट्रेकला सुरुवात 

सुरुवातीचा भाग सोपा व आल्हाददायक असल्याने सगळे आनंदी दिसत आहेत 

 पालघर मधल्या इतर ट्रेक पेक्षा ह्याचा मार्ग थोड्या वेगळ्या पद्धतीचा होता. इतर दुर्ग सुरुवातीपासूनच खड्या  चढणीचे आहेत, तर इथे सुरुवातीचा बराचसा भाग हा सौम्य चढणीचा असल्यामुळे साऱ्यांनाच बरं वाटत होतं. पण असे ट्रेक्स नंतर आपला रंग दाखवतात. कामनचंही तसंच झालं. पुढे पुढे साऱ्या ट्रेकर्सची चांगलीच दमछाक होऊ लागली. पावसाचा काहीच थांगपत्ता नव्हता, ट्रेक थोडा उशिरा सुरु झाल्यामुळे सूर्यही चांगलाच तापला होता. वर पाणी असेल की नाही या विवंचनेत पाणीही जपून वापरलं जात होत. याच कारणांमुळे ट्रेकर्स जागोजागी विसावा घेत होते, मागे राहत होते.

विश्रांती घेताना दमलेले ट्रेकर्स 
सर्वांची अवस्था पाहून आमचे गावकरी GUIDES म्हणाले, आम्ही तर कामण्यावर अर्धा-पाऊण तासांत चढतो. त्यावेळी गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये चढून दाखव, अशी फुशारकी मारून आमची EMBARASSMENT दडपण्याचा प्रयत्न केला.

ट्रेकचा बराचसा भाग झाडांनी व्यापलेला असला तरी, गरमी आणि सततच्या चालण्याने घास कोरडा पडत होता, पण पाणी तर जपून वापरायचे होते. त्यावर उपाय म्हणून गोट्या व त्याच्या मित्रांनी २ रानटी फळे आणून दिली. रसभरीत अळीव आणि आंबट कोथिंब. त्या रानटी चविष्ट फळांचा स्वाद अजूनही जिभेवर रेंगाळतो आहे. पुढे तर जांभळंही खायला मिळाली आणि ट्रेक मध्ये खरं माधुर्य आलं... अहाहा.

आंबट कोथिंब 

दुर्गाच्या मधल्या टप्प्यावर पोहोचल्यावर सर्वांनी दीर्घ विश्रांती घेतली. दमलेलो असलो तरी गडमाथा गाठायचाच  या निर्धाराने 'चले चलो' म्हणत सर्वांनी पुन्हा एकदा सुरुवात केली.
शेवटचा कठीण टप्पा पार करून सारी ट्रेकर्स मंडळी दुपारी १.३० वाजता कामन दुर्गाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली. हाश हुश्श करत सगळे जण अक्षरशः आडवे झाले. दमलेलं शरीर जसं भानावर आलं, तसे प्रत्येक जण आपापली शिदोरी उघडू लागले. डोंगरमाथ्यावरच्या त्या चिंचोळ्या भागांतच वनभोजनाचा आनंद साऱ्यांनी लुटला. गावकरी मित्रही त्यात सामील झाले.

गड भोजन 

पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक तुकडी डोंगराच्या दुसऱ्या टोकास रवाना झाली. इतरांनी डोंगर माथ्यावर भुरभुर हवेत थोडा आराम करणं पसंत केलं. डोंगर माथ्यावरून हिरवाईने सजलेला दूरवरचा परिसर अगदी सुंदर दिसत होता.

पाण्याची व्यवस्था करणारी तुकडी 

कामनदुर्गावरून दिसणारा नजारा 

समोरच्या सुळक्यावर काही टाळकी अचाट पराक्रम करण्याच्या भानगडीत दिसत होती. आमचं लक्ष मात्र सुलु आत्या सांगत असलेल्या हिमालयीन ट्रेकच्या तिच्या गोष्टींकडे होतं.

सर्वजण एका जागी जमा झाल्यावर कामनचा इतिहास आणि वसई किल्ला जिंकणाऱ्या चिमाजी अप्पांचा इतिहास कथन केला. जो या ट्रेकचा मुख्य उद्देश्य होता.
महिकावतीची बखर जी ११व्या शतकांत लिहिली गेली, तिच्यात ह्या किल्ल्याचा 'कामवन दुर्ग' म्हणून उल्लेख आढळतो. ज्याप्रमाणे पालघरमधील इतर डोंगरी किल्ले व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी बांधले गेले, त्याचप्रमाणे हा किल्ला देखील कल्याण-भिवंडी हा मार्ग आणि उल्हास नदी मार्ग संरक्षित करण्यासाठी बांधला गेला.
पोर्तुगीजांच्या ताब्यातून छत्रपती संभाजी महाराजांनी १६८३ मध्ये हा किल्ला जिंकला. परंतु मराठ्यांच्या नंतरच्या धामधुमीत पोर्तुगीजांनी १६८५ मध्ये पुन्हा हिसकावून घेतला. किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे नंतर त्यांनी ह्या किल्ल्याकडे लक्ष पुरविले नाही.
वसई किल्ले मोहिमेआधी चिमाजी अप्पांच्या योजनेनुसार पोर्तुगीजांच्या भूप्रदेशातले किल्ले काबीज करणे महत्वाचे होते. त्याप्रमाणे १७३७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला हस्तगत करून त्यावर पाण्याच्या २  टांक्या बनविल्या. ह्या किल्ल्यामुळे महत्त्वाचे व्यापारी मार्ग मराठ्यांच्या अखत्यारीत आले आणि वसई मोहिमेदरम्यान कुमक पाठवण्याकरता महत्वाचे ठरले. किल्ला लहान जरी असला तरी त्या त्या प्रदेशावर वर्चस्व मिळवण्याकरिता किती महत्त्वाचा होता, हे चिमाजी अप्पांच्या युद्धनीतीवरून समजून येते.

गडाची माहिती ऐकताना 

ही सारी कहाणी प्रथमच ऐकणाऱ्यांच्या ज्ञानात नकीच मोलाची भर पडली असणार! हेच तर अशा ट्रेकमागचं गुपित असतं, नाहीतर उगाच पाय-आपट कशाकरिता करायची... आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जागेला काहींना काही इतिहास आहे. तो इतिहास जाणून घेणं, तो जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीस समजावा म्हणून त्या वास्तू, ती जागा जतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, तरच आपली संस्कृती टिकून राहील. फक्त दुकानाच्या पाट्या मराठी झाल्याने काय होणार आहे.

आज काल महाराजांच्या नावाने फॅशन करणाऱ्यांना त्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक मराठी नेते या भूमीत होऊन गेले याबद्दल माहित नसते. चिमाजी अप्पांची STRATEGY ही आजही व्यावसायिक जगात कशी उपयोगी आहे, ह्याचं ज्ञान ही कामनदुर्गची महत्वाची कमाई ठरली. प्रत्येक ट्रेकमधून मिळणारी अशी अनुभवाची, ज्ञानाची कमाई, इतरांकडे हस्तांतरीत करत राहायला हवी.

ठीक ३. १५ वाजता गड उतारास सुरुवात केली. उतरणं हे दमछाक करणारं नसलं तरी सोपं मात्र नसतं. डोंगर माथ्यावरून सुंदर दिसणारं दृश्य यावेळी धडकी भरवत असतं, पाय थरथरत असतात, त्यामुळे बऱ्याच वेळी सावध पवित्रा घ्यावा लागतो. उतरताना सर्वांत जास्त मदत झाली ती म्हणजे गावातून आलेल्या मुलांची. जसजसे ग्रुप्स बनले त्या प्रत्येक ग्रुप बरोबर एक एका GUIDE ची साथ मिळाली. प्रसांगी त्यांनी बॅग्स घेऊन ट्रेकर्सचा भार हलका केला. अनोळखी लोकांना अशी साथ देणारी ही माणसे म्हणजे कामनची दुसरी कमाई.

अखेरीस ६ वाजेपर्यंत गाडी जिथे होती, तिथे पोहोचलो. इतरही मागून येत होते. जवळचं एक विहीर आणि गावातल्याचं एका दादाचं झोपडीवजा घर होतं.
त्याने अगदी मोठ्या मनाने स्वतःचं अंगण मोकळं करून दिलं. इतकचं नव्हे, तर आम्हां साऱ्यांसाठी चहा करण्यासाठी तो व वहिनी आपल्या एक वर्षाच्या मुलाला कपड्याच्या झोळीत झोपवून आत निघून गेला. चुलीवर बनवलेल्या त्या BLACK TEA ची चव काय वर्णावी...

अंगणात विश्रांती घेताना 

जसजसे ट्रेकर्स येत होते, त्या प्रत्येकासाठी गरम चहा ती माउली आणून देत होती, असं जवळपास तासभर तरी चाललं होतं, पण ती जोडी एकदाही कंटाळली नाही. जाण्यापूर्वी आम्ही देत असलेले पैसेही घ्यायला त्यांनी नकार दिला. मनाने कित्ती विशाल असतात हे लोकं. कुठून मिळते त्यांना ही शिकवण? लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही अनेकांना असं ज्ञान येत नाही. हा दादा, त्याची पत्नी, आम्हाला ट्रेकवर रास्ता दाखवण्यासाठी आलेले गावातले मित्र अगदी हातावर पोट घेऊन जगत असतात. काहीही ओळख नसताना आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असणाऱ्या लोकांना घरात घेणं, प्रसंगी आपली दैनंदिन कामे बाजूला ठेऊन त्यांना वेळ देणं, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ही जी चैतन्यशक्ती आहे, ती कोणत्याही बाबा-बुवाच्या सत्संगानेसुद्धा येणार नाही.

(१) गोट्या व त्याच्या सहकाऱ्यांसोबत,  (२) दादा आणि त्याचा पिल्लू 

या लोकांकडून मिळालेलं हेच चैतन्यशक्तीचं ज्ञान, आकलन आणि समज ही या कामनदुर्ग ट्रेकची अतिशय मूल्यवान कमाई !!!

या साऱ्या कामाईचं भान ठेऊन ती आयुष्यात प्रसंगी वापरणं, म्हणजेच कामनदुर्ग ट्रेकची इतिपूर्तता!!!



Tags: Kaman, Kuhe, Vasai, Bhiwandi

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साद सह्याद्रीची... निसर्गाची

उत्तनच्या किनाऱ्यावर...