उत्तनच्या किनाऱ्यावर...

बऱ्याच दिवसांच्या LOCKDOWN  मुळे बोजड होऊन बसलेल्या शरीराला चालना द्यायची वेळ आली होती. मनोमनी अनेक योजना तयार होत होत्या, परंतु सरकारच्या सतत बदलणाऱ्या योजनांपुढे आमच्या योजनाही LOCKDOWN  होत होत्या. निसर्ग बहराचा आणि ट्रेकिंगचा ऐन हंगाम असलेला मान्सून खिडकीतून पाहण्यातच  निघून गेला. खरं पाहता ते आवश्यकच होतं. स्वतःची व पर्यायाने इतरांची सुरक्षा यालाच ट्रेकरचं मुख्य प्राधान्य असावं. 

सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी मात्र अगदी जवळच्या ठिकाणी भटकायचं ठरलं. त्यासाठी DWELLING SAHYADRI च्या आम्ही ५ जणांनी उत्तन येथे बाइकस्वारी करायचं ठरवलं. सुरक्षिततेची सर्व आयुधं परिधान (हेल्मेट, मास्क, ग्लोव्हज)  करूनच बाहेर पडलो. 

 भाईंदरमार्गे उत्तनचा रस्ता पकडला. मळभट असल्याने उदासीन वातावरण होते; तरी खूप दिवसांनंतर शहराबाहेर आल्यामुळे उत्साही वाटत होते, वाऱ्याची साथसंगत आणि हलक्या पावसाचा शिडकावा सोबत होताच. मुर्धा, राय, मोर्वा, धारावी (हो, इथेही धारावी नावाचे गाव आहे) अशी कोळी वस्ती असलेली गावे पार करून पाली व उत्तनच्या सीमेवर पोहोचलो. एका डोंगरावरून तीव्र उतारावरून बाईक वेग घेऊ लागली आणि समोरील नजाऱ्याने अगदी अवाक झालो. वसई खाडीचं विशाल पात्र समुद्रात विलीन होताना दिसत होतं. बाईकच्या वेगाला आवर घालत खाडी किनारी असलेल्या बंदराजवळ पोहोचलो. बंदरावरील जेट्टीला काही नौका लागल्या होत्या. त्यावर कोळी लोकांची लगबग दिसत होती. बहुतेक मासेमारीला जाण्यासाठी त्यांची लगबग चाललेली असावी. बराच वेळ जेट्टीवर रेंगाळलो. 

उंचावरून खाडीचे दिसणारे विहंगम दृश्य 


उत्तन जेट्टी 


उत्तनच्या जेट्टीवर 

समोर दिसणाऱ्या छोट्या-मोठ्या नौका, पलीकडील वसई गाव, सुरुच्या झाडांचा हिरवागार पट्टा, उजवीकडे पुसटसा दिसणारा रेल्वे ब्रीज आणि त्याहीपलीकडे दिसणारे काही इमारतींचे टॉवर्स... देखाव्याच्या ह्या फ्रेमला वरून काळ्या ढगांचे आच्छादन आणि खाली करड्या समुद्राची BORDER लाभली होती. पण ह्या देखाव्या  पलीकडूनही साद घालत होता तो न दिसणारा वसईचा किल्ला! एकेकाळी पोर्तुगीजांचे जुलूम सहन करणारी ती वास्तू आज कित्येक शतके मराठ्यांची शौर्यगाथा गात आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. 

त्याच पराक्रमाची साक्षीदार अशी एक वास्तू खाडीपलीकडे म्हणजे आज आम्ही जिथे उभे होतो तिथे आहे, ती म्हणजे धारावीचा किल्ला किंवा डोंगरी नावाचा किल्ला. तिच्याच शोधार्थ आम्ही इथे आलो होतो. जेट्टीच्या पाठीमागचा डोंगर चढून गावात आलो. किल्ल्याचे अवशेष कुठेच दिसेना... इथून उंचावरून मात्र संपूर्ण परिसर आणखी सुंदर, विलोभनीय दिसत होता. जेट्टीवरूनच दिसणारा पण त्याचाच BIRD's EYE VIEW. 

समोरच्या घरात चौकशी केली, त्या बहीण-भावांनी छान माहिती सांगितली. त्यांच्या घरासमोरचं टेकडीच्या  समुद्राकडील भागावर बुरुज होते आणि इथेच त्याकाळी उत्तन भागावर देखरेख करणाऱ्या पोर्तुगीजांचे प्रशासकीय कार्यालय होते. तत्कालीन किल्ल्याचा मुख्य असलेला हा भाग आता मात्र कोणा सरकारी खात्यातर्फे उद्यानात रूपांतरित झाला आहे. LOCKDOWN असल्याकारणाने तेही बंद होते. उद्यान वगैरे बनविणारे हे खाते किल्ल्याचे संवर्धन करण्यात मात्र उदासीन असल्याची खंत त्या बहीण-भावांनी बोलून दाखविली. किल्ल्याचा आणखी एक महत्वाचा भाग हा खाली जेट्टीकडे जाणाऱ्या उतारावर मधल्याच भागात आहे. तिथे जायची वाटही  पूर्णपणे झाडा -झुडुपांत गुडूप झालेली आहे. तिथेही काहीच निगा राखली जात नाही अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली.  

तीव्र उतारावर गाड्या पार्क करून झाडीत जाणाऱ्या वाटेवर आमची कंपनी सरसावली. झाडीतून सावकाशितेने पाऊले टाकीत, वाटेचा अंदाज बांधत एका भल्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ पोहोचलो, त्याच्या पाठीमागे तटबंदी सदृश्य भिंत आणि आमच्या उजव्या बाजूला दिसल्या पोर्तुगीज बांधणीच्या खोल्या. एकाच धाटणीच्या ३ खोल्या, बहुतेक त्याकाळच्या सैनिकांच्या बराकी असाव्यात. या खोल्यांच्या मागचा व बाजूचा सारा परिसर वेली-फाद्यांनी आणि झुडुपांनी वेढून गेलेला होता. समोरच्या बाजूस बरोबर मध्यभागी असणाऱ्या वडाने त्या संपूर्ण परिसरावर सावली धरली होती. जणू ऊन-पावसापासून हा वडच त्या वास्तूंचा तारणहार बनून उभा आहे. काही अंतरावर ६ फुटांची तटबंदीसदृश्य भिंत असून त्यापुढे खाडी आहे. उजवीकडेच जेट्टी असल्याने, त्याकाळी समुद्रातून खाडीकडे आणि अखेरीस जेट्टीवर येऊ पाहणाऱ्या जहाजांवर बारीक नजर ठेवण्यासाठीच इथे सैनिकांची नेमणूक केली जात असावी.  

सैनिकांच्या बराकीचा भाग 

Dwelling Sahyadri चे सैनिक  

बराकीसमोरील तटबंदी आणि त्यामागे दिसणारी खाडी 


तटबंदीमध्ये असणाऱ्या झरोक्यांमधून सैनिक जहाजांवर लक्ष ठेवत असत  


ह्यांचीही होती सोबत 

काही वेळ निरीक्षण करून पुन्हा बाईक लावलेल्या जागेवर आलो. तिथे पोलिसांची गाडी उभी होती. 'काय करत होतात तिकडे आडवाटेला' असा पोलिसी खाक्या प्रश्न दमटावणीच्या स्वरूपात विचारलाच. परंतु, आमचा फिरण्याचा सुयोग्य मानस ऐकून साहेब शांत झाले आणि पुढच्या दौऱ्यास निघून गेले. 

अगदी आड बाजूला असल्यामुळे ही जागा कोणाच्या लक्षात येत नाही, बाहेर तसा फलकही नाही आणि म्हणूनच बेवड्या, गर्दुल्ल्या लोकांचे आश्रयस्थान बनून राहिली आहे. फक्त हीच जागा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील भल्या-भल्या वास्तूंना असेच दुर्भाग्य वाटेला आलेले आहे. इतिहासात स्वतः भस्म होऊन पुढच्या पिढीचे भविष्य उजळवणाऱ्या या शिल्पकृतींचे जतन करण्यासाठी तुम्ही-आम्ही मिळून प्रयत्न करायला हवेत. 

उत्तनच्या रस्ताने आणखी काही अंतर पुढे गेल्यावर एक सरळसोट ROCK CUT असलेला डोंगर दिसतो. याच्याच  माथ्यावर काही वेळापूर्वी उभे राहून, जिथे आता उद्यान बनविले आहे, आपण संपूर्ण परिसर न्हाहाळला होता. 




ROCK CUT डोंगर 

या सरळसोट डोंगराकडे पाहून अंधेरीच्या गिल्बर्ट हिलची आठवण होते. असं म्हणतात, वसई किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी या डोंगराचे दगड वापरले म्हणून हे असे डोंगराचे रूप झाले. इतक्या वर्षात ह्या सपाट  कड्यावर अनेक झाडेही उगवली आहेत. त्यांच्या पसरलेल्या फांद्या आणि मुळे, तसेच आजूबाजूला नव्याने लावलेली झाडे यामुळे ह्या ताशीव कड्याला आणि परिसराला एक विलोभनीय स्वरूप आलंय. 

डोंगराच्या पायथ्याकडील परिसर 


फोटोला छानशी POSE देणारा इमू पक्षी 

कड्याच्या पायथ्याशी पिंजऱ्यात काही पक्षी, ससे ठेवले होते. थोडी फोटोग्राफी करून मोर्चा उत्तन समुद्र किनाऱ्याकडे वळवला. दुपारची वेळ असली तरी समुद्र किनाऱ्यावरील रस्त्यावरून गाडी हांकताना अगदी प्रसन्न वाटत होतं . 

किनाऱ्यावर मासे सुकवण्यासाठी टाकलेले बांबू 

वेलंकनी मंदिराकडे जाणारा सुबक रस्ता 

उत्तन बीचच्या अलीकडेच समुद्र किनाऱ्यावर बांधलेले वेलंकनी मातेचे मंदिर लागते. मंदिराच्या समोर छोट्याशा टेकडीवर चर्च असून सारा परिसर स्वच्छ आणि सुशोभनीय करून ठेवला आहे. स्वच्छ, सुंदर परिसर, समुद्रावरून येणारा वारा, आणि सोबतीला मंदिर परिसरात वाजणारा SAXOPHONE. आणखी काय हवे एक संध्याकाळ व्यतीत  करायला...  

वेलंकनी मंदिर, मागे समुद्र 

टेकडीवरील चर्च 


चर्चचे आवार 

बराच वेळ निघून गेला... मग गाडी उत्तन बीच कडे वळवली. LOCKDOWN मुळे गर्दी बिलकुल नव्हती. मनसोक्त बीच राईड आणि फोटोशूट केले. घरून आणलेल्या अल्पोपाहारावर यथेच्छ ताव मारला.  

उत्तन बीच 

बीचवर बुलेट रायडिंग

परतीच्या प्रवासासाठी गोराईची वाट पकडली.त्या आधी संपूर्ण प्रवासात नाकात भरून राहिलेल्या सुक्या मासळीचा वास रिकाम्या हाताने परतू कसा देईल, म्हणून एका घरातून  बऱ्यापैकी पुरेल असा सुके बोंबील, सुके बांगडे आणि जवल्याचा साठा जमा करूनच निघालो (इथे घर-घरांत सुकी मासळी मिळते, फक्त त्यांच्यासोबत प्रेमपूर्वक घासाघीस करता आली पाहिजे). 

सुक्या मासळीचं गणित समजावून सांगणारी प्रेमळ मावशी 

मुंबईला अगदी लागूनच असल्याने उत्तनचा असा साग्र-संगीत कार्यक्रम एका दिवसात छानपैकी आटोपता येतो. गोराई - उत्तनच्या किनाऱ्यावर आता बऱ्यापैकी रिसॉर्ट्स झाल्याने, संपूर्ण दिवस फिरून समुद्राच्या सहवासात  NIGHT STAY सुद्धा करता येईल. जेवणात जिभेचे चोचले पुरवायला मासे उपलब्ध आहेतच. मोटर बाईक किंवा सायकलने बोरिवली-गोराई खाडी मार्गे फेरी मधून उत्तनला लवकर पोहोचता येते, शिवाय येथील छोटेखानी रस्त्यांवर राईड करणे म्हणजे वेगळाच अनुभव. 

जर कधी गेलाच, तर इतर मौज-मजेशिवाय उत्तनच्या डोंगरी (धारावी) किल्ल्याला अवश्य भेट द्या. तेथील स्थानिकांना जाणीव होऊद्या की ही  जागा ऐतिहासिक दृष्टया किती महत्वाची होती, जेणेकरून स्थानिकांतर्फेच  स्वयंप्रेरणेने संवर्धनाचे काम हाती घेतले जाईल. 


tags: Uttan, Gorai, Dharavi, Vasai, Dongri fort, Velankani, Dry fish, suke mase, suki machhi, getway

टिप्पण्या

  1. खूपच छान लिहिलंय दादा! जून्या आठवणी जाग्या झाल्या ...

    उत्तर द्याहटवा
  2. निशांत पराग राणे आणि पराग कांबळी हीरेन senior and junior खूप खूप छान होता हा अनुभव
    प्रत्याक्षत येता नाही आल पण वाचुन खूप बर वाटल अस वाटल कि स्वतः अनुभवत आहे

    पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर आहे जागा दादा आणि लिहीलय सुध्दा खूप छान.

    उत्तर द्याहटवा
  4. काही तरी नवीन माहिती, खूपच छान, उत्तांचे उत्तम वर्णन.

    उत्तर द्याहटवा
  5. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. अत्यंत सुंदर असे निसर्गाचे वर्णन व खुप मनाला भिडणारा लेख आहे .

    उत्तर द्याहटवा
  7. खुप छान लेख लिहिला वाचताना निसर्गात आहे असे वाटले.

    उत्तर द्याहटवा
  8. नक्की नेणार. Stay updated with me 🙂
    dwelling Sahyadri cha whatsapp group ahe, for latest expedition.

    उत्तर द्याहटवा
  9. Faar surekh. Tumchya lekhanitun swtahaala tikade janyachi odha laagali aahe.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साद सह्याद्रीची... निसर्गाची

कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 1) ....