कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 1) ....

 बरेच दिवस मनात रुंजी घालणारा सागरगड यंदा करायचाच असं ठरवलं होतं खरं, पण न संपणारा LOCKDOWN  काही मोठं प्लॅन करूच देत नव्हता. तरी अखेरीस कोजागिरीचं निमित्त साधून ट्रेकचा बेत आखला. सुरुवातीलाच आम्ही ४ जण पक्के झालो होतो. संध्याकाळच्या वेळी ट्रेक करून रात्री गडमाथ्यावर चंद्रप्रकाशात  (FULL MOON) मस्त मसाला दूध बनवून प्यायचा असा कोजागिरी साजरा करायचा प्लॅन केला होता. बऱ्याच जणांना MESSAGES, PINGS, UPLOADS करून सुद्धा अपेक्षेनुसार कोणतीही बेरीज, वजाबाकी न होता, आम्हीच ४ जणांनी जायचं ठरवलं. कोजागिरीचा दिवस चुकवायचा नव्हता. कारण  चाळीतलं घर सोडल्यापासून कोजागिरी कधी साजरी केलीच नव्हती. 

४ जण असल्यामुळे बाईकने जायचा प्लॅन केला. या इव्हेंटला थोडा अधिक तडका देण्यासाठी म्हणून भाऊच्या धक्क्यावरून FERRY मध्ये बाईक्स टाकून रेवसला जायच ठरवलं. सगळा जामानिमा गोळा करून कोजागिरीच्या संध्याकाळी ३.३० च्या आसपास भाऊच्या धक्क्यावर पोहोचलो. परंतु तिथे पोहोचल्यावर कळलं की  रेवसला जेट्टीचं काम चालू असल्यामुळे तिथे जाणारी फेरी बंद आहे. झालं... सागरगड ट्रेकच्या आव्हानांची सुरुवात इथे सुरुवातीलाच झाली. आता समोर २ पर्याय होते, एक तर मोरा पर्यंत फेरीने जाऊन उरण मार्गे सागरगड किंवा नव्याने चालू झालेल्या M२M (मुंबई ते मांडवा) या LUXURY FERRY ने मांडवा पर्यंत पोहोचून मग सागरगडला पोहोचायचं. वेळेचं आणि पैशाचं गणित मांडलं. M२M च्या पुढच्या फेरीला अजून २ तास होते आणि ती बरीच खर्चिक होती. मोरा फेरी त्यामानाने स्वस्त आणि पुढच्या अर्ध्या तासात निघणार होती. थोडा वळसा आणि लांबवर पडणार होतं, पण पॉकेट मध्ये बसणारं होतं (पारंपरिक ट्रेकर असल्याने तो विचार आधी करावा लागतो). 

पेपर तपासणीचे सोपस्कार पार पाडून, पोलिसांचा OK घेऊन बाईक्स बंदरावर लावल्या. फेरी आल्यावर यथावकाश आमच्यासोबत बाईक्सना फेरीमध्ये स्थान मिळाले. बुलेट फेरीमध्ये चढवताना, उतरवताना एक वेगळाच मान तिला मिळतो आणि इतर बाईक पेक्षा ४ हात जास्तच लागतात. मागे तळ कोकणातून बसमधून बुलेट आणते वेळीही अशीच दमछाक करणारी कसरत करावी लागली होती. 

भाऊच्या धक्क्यावरून फेरीत स्थानापन्न झालेल्या बाईक्स 

समुद्र फेरी 

तासाभरानं मोरा बंदराला फेरी लागली. या बंदराची जेट्टी अगदी जीर्ण वाटते. अगदी PIRATES of CARRIBEAN  मधल्या कुठल्या तरी गूढ आणि खतरनाक बंदरासारखी ! आणि इथे वावरणारे लोक सुद्धा ! या जेट्टी वरून वरच्या मजल्यावर यावे लागते, जो की मुख्य रस्त्याला एका लांबलचक पूलाद्वारे जोडलेला आहे. जेट्टीवर बाईक उतरवून ती वरच्या मजल्यावर चढवणे म्हणजे एक मह्तदिव्य काम, त्यात आणि बुलेट! पण याचा अनुभव मागे एकदा घेतलेला असल्याने हे काम करणाऱ्या इथल्या लोकांबाबत आश्वासक होतो. 

मोरा बंदर 


मोरा बंदराला रस्त्याशी जोडणारा पूल 

त्या अरुंद पुलावरून आता बाईक सफारीला सुरुवात झाली. एव्हाना संध्याकाळचे ५.१५ झाले होते. उरण मार्गे पाताळगंगेवरच्या ब्रीजवर पोहोचेपर्यंत सूर्य क्षितिजापलीकडे गेला होता. रेवसची फेरी रद्द झाल्यामुळे ठरवलेलं वेळेचं गणित पूर्णपणे कोलमडलं होतं. परंतु येईल त्या वेळेला सामोरं जायचा अनुभव अनेकदा घेतला होता, त्यात आता नवीन भर पडणार होती. 

पाताळगंगेचा लांबलचक पूल पार करून पुढे GOOGLE MAP वर दाखवणाऱ्या रस्त्याने न जाता उजवीकडे हमरापूर दिशेने जाणारा उर्नोली-पेण रस्ता पकडला जो गावा-गावातून जाणारा शॉर्टकट होता. रस्ता नव्हे.... असं वाटत होतं की कोणत्यातरी कारखान्यात फिरत आहे. रस्ताकडेला असणाऱ्या प्रत्येक घरांत किंवा घराबाहेरील मोकळ्या जागेत लहान-मोठ्या मूर्त्या अन साचे ठेवलेले होते. हीच ती गावं आहेत जिथून गणपती बाप्पा सगळ्या जगभरांत पोहोचतात. पेणजवळची ही गावं म्हणजे कारखाने आहेत मुर्त्यांची आणि त्यांना घडविणाऱ्या कारागिरांची!!! रस्त्यावरून प्रवास करताना जिथे नजर जाईल तिथे फक्त मूर्त्याच  दिसत होत्या... काही घडलेल्या आणि काही घडणाऱ्या. पूर्वी मातीच्या बनणाऱ्या या कलाकृतींना हल्ली मात्र ग्रहण लागले ते चीन मधून आयात होणाऱ्या स्वस्त, हलक्या POP च्या मूर्त्यांचं. त्या स्पर्धेत टिकण्यासाठी म्हणून आपल्याकडेही POP वापरलं जाऊ लागलं. पण त्यात ऱ्हास होऊ लागला आमच्या पर्यावरणाचा, निसर्गाचा आणि पारंपरिक कलाकाराचा. 

भानावर आलो (मागच्या सीटवर होतो, अन्यथा भान हरपून कसे चालेल बरं बाईक चालवताना) तेव्हा NH -६६ वर पोहोचलो होतो. हल्ली प्रत्येक प्रवासात ह्या महामार्गाचे रूप बदललेले वाटते. नवीन साज चढविलेल्या या रस्त्यावरून वडखळ कधी पार झाले कळलेच नाही. त्या नवीन FLYOVER मुळे खाजगी वाहनांच्या ROAD MAP वरून वडखळ दिसेनासाच झाला आहे. अन्यथा कोकणात प्रवास करणारा असा कोणी व्यक्ती नसेल, ज्याने वडखळच्या ट्रॅफिकचा आणि इथल्या मिसळ, वडाचा आस्वाद घेतला नसेल. वडखळची अशी ख्यातीच निराळी आहे, त्यासाठी वेगळाच BLOG लिहावा लागेल. 

वडखळ नंतर अंबा नदीजवळील JSW चा धूळखाऊ रस्ता पार करणं हे अलिबाग कडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी आणखी एक आव्हान. मोठं-मोठाले ट्रक्स सोबत असतील, तर त्यात आणखी भर. काळोखाची वेळ अन बाईकचा प्रवास म्हणजे या आव्हानचा डबल डोस. अनेकदा अलिबागला ROAD TRIP केली असल्याने डोळे मिचकावत हे दिव्यही पार केलं. १० मिनिटांत पोयनाड लागलं. इतर वेळेला गजबजलेलं पोयनाड LOCKDOWN मुळे बरंच शांत होतं. एका भावाची भजी -वडाची गाडी दिसली. होते, नव्हते सगळे वडे पोटात ढकलले. घरून आणलेली चहा त्यावर रिचवली. आता सागरगड बेस फार दूर नव्हता. कार्ले खिंडीचा घाट उतरताच डावीकडे खंडाळे गावात जाणारा रस्ता पकडला. कोपऱ्यावरच्या दुकानदाराकडून पुरेशी माहिती घेतली, पण...  पण ती तितकीशी पुरेशी नव्हती, हे नंतर कळालं.  

गावातल्या अरुंद वळणदार रस्त्याने आम्ही सुरुवात केली. शांत वातावरणात बाईकचा आवाज घुमत होता. कोजागिरीचं टिपूर चांदणं पसरलं होतं. लकी अलीच 'अंजानी राहों में, तू क्या ढुंढता फ़िरे.... ' गाणं गुणगुणत मस्त बाईक हाकत होतो. पण अंजानी राहोचा आनंद फार काळ टिकला नाही. गावातला खडबडीत डांबरी रस्ता कच्च्या रस्त्यात बदलला. रस्त्यातले मोठमोठाले दगड बाईकचा प्रवास खडतर करू लागले. छोट्या दगडांमुळे तर  चाकांना व्यवस्थित ग्रीप मिळत नव्हती. अनेकदा बाईक घसरते कि काय असं वाटत होतं. अशा रस्त्यांवर ना गाडी पळवू शकतो, ना ब्रेक लावू शकत. त्यात जड  बुलेटचा तोल सांभाळत तिला एका दिशेत चालवत ठेवणं म्हणजे तारेवरची नव्हे, तर कच्च्या रस्त्यावरची कसरत त्या चालकालाच माहिती. जवळपास ३ किलोमीटर आलो तरी  दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे ट्रेकिंगचा स्टॉप काही कळेना. त्यामुळे थांबायचं कुठे हे समजत नव्हतं. विचारावं, तर कोणीही  दिसेना. वाट दिसेल तसं पुढे गाडी चालवत होतो. पूढे एका ठिकाणी तर रस्ता चिखलात विरघळला होता. हो, तसंच म्हणावं लागेल. जवळपास ४०-५० मीटरच्या त्या चिखलात बाईक घालायची हिम्मत होईना. फसली, तर कोजागिरीची रात्र तिथेच काढावी लागेल या विचाराने बाईक लावून पुढे जाऊन पाहून आलो. बाजूने अतिशय अरुंद म्हणजे रस्त्याच्या बाजूला जिथे गवत उगवतं तिथे अगदी बाइकचं चाक जाईल एवढी जागा होती अन त्याच्या बाजूला एक हात खोल जमीन अन तिथे उगवलेली वेडीवाकडी झाडे. 

ठरलं... जायचं. शांत झालेलं बाइकचं इंजिन सुरु केलं. फ्लॅश लाईटचा प्रकाश चिखल आणि त्याबाजूच्या वाटेवर, झाडांवर  पडला. दोघे गाईड करायला समोर उभे राहिले. दोन्ही बाजूला पाय टेकवत कांबळी मास्तरच्या  पॅशनची हेडलाईट चिखला पलीकडे गेली. पॅशन पार होताच बुलेटचा आत्मविश्वास वाढला. पण रुंदी जास्त असल्याने दोन्ही बाजूला पाय टेकवणं शक्य नव्हतं. त्यात चाक एकाच जागेवर थांबल्यास गवतावरून घसरण्याची शक्यता पण होती. सगळ्या शक्यतांचा विचार करून  एका बाजूला तोल सावरत आणि थोडं झाडांच्या बाहेर आलेल्या फांद्यांना घासत बुलेट पार झालीच. माझ्या ADVENTURE CV मध्ये ह्या आणखी एका MOMENT ची वाढ झाली. 

पण हा विलक्षण आनंद सुद्धा फार काळ टिकला नाही. कारण त्यापुढेच २ मिनिटांवर एक भली मोठी चढण होती अन त्याच्या वाटेत होते, मोठं-मोठे दगड. पुन्हा एकदा बाईक लावून अंदाज घेण्यासाठी २ जणांचं पथक पुढे पाठवलं. ती वाट मुळी नव्हतीच, असं वाटत होतं. बाईक तिथे चढवणं शक्यच नव्हतं आणि त्या रात्रीच्या वेळी, गावातल्या आडवाटेला ते साहस करणं योग्यही नव्हतं. 

पण आता करायचं काय... पुढे जाऊ शकत नाही आणि मागे जायचं, तर पुन्हा ती चिखलवाट पार करावी लागणार. पार केली तरी खाचखळग्यांनी भरलेल्या त्या वाटेने जाणार तरी कुठे... चांगलाच पेच उभा राहिला होता. चांदण्या रात्रीत गडावर मस्त मसाला दूध प्यायची आमची इच्छा दगडधोंड्यांनी भरलेल्या या वाटेवरच्या धुळीत विरून चाललेली दिसत होती.... 

(पूर्वार्ध)... 

आमची चौकडी 

टिप्पण्या

  1. Wa bhava, to trek punha ekda jivant zala. Apratim. Uttrarardha chi vat baghatoy.

    उत्तर द्याहटवा
  2. लिखाण अप्रतिम लिहिले आहे. वाचताना असे वाटले की मी पण या ट्रेकचा एक भाग आहे. किती निरीक्षण आणि दुरदर्शीपणा ते! सगळे देखावे डोळ्यासमोर जिवंत उभे राहीले. मी पण तुझ्याबरोबर ट्रेकला गेली आहे, ते पण दिवस आणि आठवणी जाग्या झाल्या. असेच लिहित रहा आणि आम्ही ते वाचुन प्रत्यक्ष अनुभवत राहू.

    उत्तर द्याहटवा
  3. Pratyek kshan anubhawalyasaarakhaa waatato. Pratyaksha jaawese waatate. Pan pudhacha tuzha bhannat prawaas nahi lihilaas. Kojagiriche dudhache celebration pending aahe

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साद सह्याद्रीची... निसर्गाची

उत्तनच्या किनाऱ्यावर...