सुधागडावरील अमृतानुभव

पालीच्या बल्लाळेश्वराचा टिळा कपाळी लावून सुधागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या दर्या गावात पोहोचलो. नियोजित वेळ चुकल्यामुळे गावातच पिठलं भाकरी खाऊन दुपारी ३.३० वाजता गड चढाईला प्रारंभ केला. ऊन आणि दमट  वातावरणामुळे पुरतीच वाट लागली. कशाबशा दोन शिडया पार झाल्या आणि समोर सरबत विकणाऱ्या ताईला पाहून स्वर्ग गवसल्यासारखं वाटून गेलं. दिवसभरात एकही सरबत न विकलेल्या ताईकडे ग्रुपमधील शेवटचा ट्रेकर येईपर्यंत सगळा स्टॉक संपलादेखील, पाणी आणि पिळलेले लिंबू सुद्धा उरले नाहीत. फक्त १४ जण होतो आम्ही. 

कातळाला तासून बनविलेला चिलखती बुरुज 

पहिला चिलखती बुरुज पार करेपर्यंत सूर्य क्षितिजाकडे झेपावला होता आणि गडमाथ्यावर पोहोचेपर्यंत काळोखाचे साम्राज्य पसरले होते. आता चढाई जरी नसली तरी सुधागडवरच्या विस्तीर्ण पठारावरून पंतसचिवांचा वाडा गाठणं, एक आव्हानच होतं. पण इथेच खरा अनुभव पणाला लावत आणि नवीन ट्रेकर्सना NIGHT TREK चा थरारक  अनुभव देत, वाड्यावर पोहोचतं केलं. ट्रेकच्या सुरुवातीलाच थकलेले असले तरी सर्वांनी काळोख्या ट्रेकिंगमध्ये मात्र कमालीची उत्स्फूर्तता दाखविली.... 

मग वाड्याची साफ-सफाई पासून टेन्ट लावण्यापर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला. तोपर्यंत ग्रुपचा आचारी आशिष दादाने बनवलेल्या चहा आणि सूपचा आस्वाद घेऊन सगळेच REFRESH झाले. जेवण बनायला आता वेळ लागणार होता. तोपर्यंत, श्लोक आणि वेदांत या १० वर्षाच्या मुलांच्या CAPTAINCY  मध्ये २ टीम्स बनवून GROUP ACTIVITY करायच्या ठरवलं. फुल्ल जोशात झालेल्या ह्या ACTIVITIES नकळतपणे व्यवस्थापन कौशल्ये जसे की TEAMWORK, LEADERSHIP, निर्णयक्षमता अशा काही गोष्टी कमी वेळात शिकवून गेल्या. ACTIVITIES   संपेपर्यंत आशिष दादाचा मटर पुलाव रेडी झाला होता. त्यावर ताव मारून, भांडी वगैरे घासून पुन्हा स्थिरस्थावर होईपर्यंत रात्रीचा १ वाजला. 

मटार पुलाव आणि पंगत

झोपेच्या आधी छोटासा दीपोत्सव करायचा ठरवलं. मुद्दाम आणलेल्या पणत्यांनी वाड्याचा एक कोपरा उजळून निघाला. पणत्यांच्या त्या मिणमिणत्या ज्योतींकडे पाहून कधीकाळी स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या धगधगत्या वणव्यात निखारे होऊन उडी मारलेल्या या वाड्यातून आणि गडावरून निघालेल्या त्या असंख्य महापुरुषांना मुजरा करण्यास हात आपोआप कपाळाकडे गेला. 

दीपोत्सव 

दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० चा WAKE-UP  CALL देऊन गावातून गडावर आलेल्या नाग्या काकासोबत पिण्याचे पाणी भरायचे म्हणून दिंडी वाटेकडे उतरलो. आदल्या दिवशीच्या LATE ACTIVITIES मूळे लगेच कोण उठतील याची शाश्वती नव्हती. 

निर्मल आणि चवीला मधुर पाणी पिऊन कालच्या दिवसभराचा सगळा क्षीण क्षणात उतरला. चोर दरवाजा बघून यावा म्हणून आणखी खाली उतरलो, तर अगदी मंत्रमुग्ध करणारा नजारा समोर दिसत होता. गडासमोरच्या दरीत ढग पसरले होते, म्हणजे मी अगदी त्या पसरलेल्या ढगांच्या वर होतो. असं वाटत होतं  की सह्याद्रीच्या त्या निसर्गाने ढगांची दुलई पांघरून घेतली आहे आणि सूर्य नारायणाची वाट पाहत हा निसर्ग मस्त पहुडला आहे. जगभरात अनेक ठिकाणी फिरलो, सह्याद्रीत खूपसे ट्रेक्स केले, पण आत्ता इथे पाहत असलेलं दृश्य फार क्वचित पाहायला मिळतं. 

छोट्या छोट्या सोनकीच्या फुलांचा गालिचा पसरला होता, त्यापुढे अजूनही भक्कम अवस्थेत असलेली काळ्या दगडाची सुधागडाची तटबंदी आणि पलीकडे हिरव्यागार डोंगरावर पसरलेली पांढऱ्या ढगांची चादर... त्या दृश्याशी समरस होत कधी त्या निसर्गाशी एकरूप झालो, कळलंच नाही. अनेक दिवसांची वारी करून जेव्हा वारकरी विठू माऊलीचं दर्शन घेताना त्याच्या मनात जे भाव असतील तसेच अनेक तासांची पायपीट करून आल्यावर सह्याद्रीच्या अशा दृश्याशी एकरूप होताना आम्हा ट्रेकर्सच्या मनातही अगदी तसेच भाव असतात... आणि हाच डोळ्यांनी भरून बघितलेला, मनांत साठवलेला निसर्ग पुढच्या बऱ्याच दिवसांसाठी चेतना देऊन जातो. 

पहाटे दिसलेलं विहंगम दृश्य 

नाग्या काकाच्या आवाजाने भानावर आलो. डावीकडे मध्येच डोकं वर काढणारा डोंगर उतारावर बांधलेला आखूडसा ओंबळे बुरुज आणि त्या बुरुजापर्यंत जाणारी तटबंदी दिसत होती. 

डोंगर उतारावर बांधलेली तटबंदी आणि फोटोच्या मधोमध दिसणारा, तटबंदी अखेरीस असलेला आखूडसा
 ओंबळे बुरुज - वर्षानुवर्षे अजूनही शाश्वत आहे. 

आता मन हळूहळू इतिहासात शिरू लागलं.... गड बांधणाऱ्या आणि डोंगर उतारावर अशक्य अशी ही तटबंदी आणि बुरुज बांधणाऱ्या त्या अज्ञात अभियंत्यांना सलाम केला. खाली दरीचा ठावही न दिसणाऱ्या त्या निसर्गात आणि ऋतू चक्रात ती अजूनही तिच्या स्वामींनी दिलेल्या गड रक्षणाच्या कार्यात सक्षम उभी आहे. त्या थोरल्या स्वामींचे पाय १६५७ मध्ये ह्या गडाला लागले आणि भोरपगडाचा सुधागड झाला.  गड अमृतात न्हाऊन निघाला. अमृत म्हणजेच सुधा.... 

राजधानीचा मान मिळाला नाही, तरी राजधानीयोग्य बांधकाम इथे झाले पाहिजे, ही स्वामी आज्ञा इथल्या शिल्पकारांनी तंतोतंत पाळली. भरभक्कम आणि कोणत्याही आक्रमणाला थोपवून धरेल असा महादरवाजा उभा राहीला, भक्कम चिलखती बुरुज व अभेद्य तटबंदी, त्यातील चोर वाटा, धान्याचे व दारूचे कोठार, अनेक वाडे, तलाव, भोराई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार यामुळे गडावरील राबता वाढला. 

भोराई देवीचं मंदिर 

मंदिराच्या परिसरात अनेक वीरगळ आणि स्मारक पाहायला मिळतात

तटबंदीच्या आत उतरणारी आणि बाहेर पडणारी चोरवाट

महादरवाजा आणि त्यावरील स्थापत्य-विशेष 

यथावकाश हा गड स्वराज्याचे पंतसचिव यांच्या अखत्यारीत आला, ज्यांनी या किल्ल्यासोबतच स्वराज्यातल्या अनेक किल्ल्यांची १९५० पर्यंत व्यवस्थित देखभाल केली. इमानाने स्वामीनिष्ठा पाळणाऱ्या ह्या माणसांमुळेच आम्ही हे वैभव आज पाहू शकत आहोत. 

महादरवाजाजवळ साफ-सफाई करणाऱ्या 'बा रायगड' परिवारातील सदस्यांना पाहून पुन्हा तीच स्वामीनिष्ठ माणसं  आठवली. रविवारची मौज बाजूला ठेवून ही मुलं एवढी पायपीट करत येऊन इथे कामाला लागली होती. त्यांच्यासमोर आपलं कर्तृत्व गौण असल्यासारखं वाटून गेलं. पण त्याच मुलांनी जेव्हा महादरवाजाचं स्थापत्य-विशेष आणि इतिहास ऐकून कौतुक केलं, तेव्हा आपलाही खारीचा वाटा स्वामीनिष्ठ कार्यात लागतोय, हे जाणून छान वाटलं. 



पंतसचिवांच्या वाड्यात 'बा रायगड' परिवारासोबत 


सुधागडाच्या विस्तीर्ण पठारावरून निसर्गाचं अनमोल असं दर्शन घेता येतं , विशेष लक्ष वेधून घेते ती समोरच उभी असलेली तेलबैलाची अजस्र भिंत. त्या अजस्र कातळावरील हिरवाई पाहून आश्चर्य वाटतं,  पण म्हटलंच आहे...   

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा,
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा , महाराष्ट्र देशा  
तेलबैलाची अजस्र भिंत 

विधात्याने भरून ठेवलेला भोरप्याच्या डोंगराचा आणि आजूबाजूच्या निसर्गाचा हा सारा अमृतकुंभ काही वेळ डोळे भरून मनात साठवला, थोरल्या स्वामींनी ह्याच अमृतकुंभाच्या साहाय्याने केलेला अट्टहास आठवला आणि डोळे बंद करून कुंभातले काहीसे अमृतथेंब प्राशन करण्याचा प्रयत्न केला. 
संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला अमृतानुभव असाच असावा...  

अमृतकुंभ 

 गडावरील इतर बांधकामांची वैशिष्ट्ये आणि गडाशी संबंधित इतिहास कथन करत गड उताराला सुरुवात केली. गावात जेवणावर यथेच्छ ताव मारून मुंबईच्या दिशेने गाड्या पिटाळल्या. गाडी वेग धरत होती पण मनात मात्र  रुंजी घालत होता सुधागडावरील अमृतानुभव!!!


#sudhagad #sahyadri #trekking #maharashtra


टिप्पण्या

  1. अप्रतिम लिखाण निशांत😊 Keep it up🤘🏻

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान वर्णन केलंय निशांत दादा. पुन्हा एकदा सुद्धा गड च्या आठवणी जाग्या झाल्या.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साद सह्याद्रीची... निसर्गाची

कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 1) ....