तांदुळवाडीवरचा बार्बेक्यू


ठरलेल्या ट्रेनने आणि ठरलेल्या वेळी सफ़ाळेला सर्वांची गाठभेट झाली. स्टेशन परिसरांत योग्य त्या जिन्नसा घेऊन आमची १० जणांची तुकडी पाटील दादांच्या जीप जवळ आलो. जून महिन्यांतला पाहिला शनिवार आणि कलतीचं  उन असल्याने वातावरणांत उकाडा जाणवत होता. ७-८ किमीचं अंतर असलं तरी फक्त ५ मिनिटांत तांदुळवाडी येईल, असं बोलून पाटीलभाऊंनी आधीच्या पॅसेंजरांसोबत आम्हाला कसंबसं कोंबून बसवलं. १५-२० मिनिटांचा तो प्रवास चांगलाच कसरतीचा पण तितकाच गंमतीचाही झाला.


तांदुळवाडी गावात पोहोचल्यावर 'मुख्य जिन्नस' घेण्यासाठी परत अर्धा किमी मागे जावं लागलं, त्यात आणखी अर्धा तास गेला. गावातल्या दिलीपभाऊंच्या घरातून यथायोग्य पाण्याची कुमक घेऊन आमची तुकडी संध्याकाळी ६.४५ वाजता दुर्ग चढणीच्या वाटेस लागली.

गावातून दिसणारा तांदुळवाडीचा डोंगर

तांदुळवाडीच्या वाटेवर 

१० मिनिटांतच खडा चढ सुरु झाला आणि शरीरासोबत मानसिकतेचा कस लागणार याची जाणीव झाली. कारण ग्रुपमधील सारेच जण आज बऱ्याच दिवसांनी ट्रेकला आले होते. त्यात उकाड्याचे दिवस, सोबत CAMPING च्या उद्देश्याने सामान व पाण्याचेही वजन होते.
आता सूर्य मावळून अंधार पडायलाही सुरुवात झाली होती. प्रचंड उकाड्यामुळे खूप दमछाक होत होती आणि दुर्गमाथा काही नजरेच्या टप्प्यात येत नव्हता. ट्रेकचा अखेरचा टप्पा तर अतिशय निर्णायक होता. पूर्ण खड्या चढणीचा आणि मोठमोठ्या दगड-धोंड्यांतून वाट काढत वर चढणारा. मध्येच असंही वाटलं की बस्स... इथल्याच एखाद्या दगडावर झोपून जाऊया! परंतु, त्या शांततेत काही क्षण निवांत बसल्यावर लुकलुकणाऱ्या काजव्यांकडे पाहून मनात पुन्हा उभारी यायची आणि पथक पुन्हा तयार व्हायचं.

अखेरीस त्या काळोख्या रात्री ९.३० वाजता आम्ही तांदुळवाडी सर केलाच... हुश्श! १० मिनिटे आराम करून सारे जण कामासाठी स्वयंसफुर्तीने तयारही झाले. सह्याद्रीच्या ट्रेक्समध्ये हीच गम्मत असते, ट्रेक करताना कितीही दमछाक होउदे, एकदा का डोंगरमाथा गाठला की विजयश्री संचारते. मन पुन्हा उल्हसित होते अन शरीरालाही संजीवनी मिळाल्याप्रमाणे पुन्हा उभारी मिळते. पुढच्या ट्रेकला याची अनुभूती घ्याच.

प्रत्यकाने कामाची जबाबदारी घेतली. काहींनी tents लावण्यास उधार घेतला, काहींनी चुलीचे दगड गोळा करून चूल मांडली, लाकडे गोळा केली. गावातून घेतलेल्या 'मुख्य जिन्नसला' काहींनी मसाला लावला. तयारीचे सारे सोपस्कार पूर्ण करून सर्वांनी जेवणाचे डब्बे उघडले, त्याआधी पाण्याचा काउन्ट घेतला गेला. रात्री व सकाळचे पाणी बाजूला काढून ठेवले. जवळपास कुठे पाण्याचं टाक सापडलं नव्हतं. त्यामुळे जे होतं, ते पाणी जपून वापरणं भाग होतं.

टेन्ट्सचे व्यवस्थापन 

एव्हाना, चुलीवर ड्राय चिकन तापू लागले होते आणि त्याचा खमंग टोळक्यांच्या नाकात शिरला. मुख्य जिन्नस हे चिकन आहे हे कळल्याबरोबर साऱ्यांचे डब्बे म्यान झाले आणि सारी टोळी चुलीजवळ ठाण मांडून बसली. जेवता जेवता बार्बेक्यूचे चिकन ताटांत येऊ लागले. चांदण्या रात्री वैतरणा नदीच्या सान्निध्यात, १९०० फुटांवरील ते जेवण अतिशय संस्मरणीय झाले.


चमचमीत बार्बेक्यू 

जेवण झाल्यावर आपापली कामे आटोपून झोपेच्या आधी सर्वांनी तांदुळवाडीचा इतिहास आणि त्याचे भौगोलिक महत्त्व समजून घेतले.
तांदुळवाडी किल्ला नक्की कोणी बांधला याची नोंद काही सापडत नाही. परंतु, महिकावतीची बखरनुसार तो १५व्या शतकापर्यंत राजा भीमदेवाच्या अखत्यारीत होता. नंतर १४५४ साली अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती सर करून हा  सारा भूप्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतला. पुढे १५०९ पासून दीर्घकाळ पोर्तुगीज आणि १७३७ मधील हल्ल्यात मराठ्यांच्या ताब्यात हा दुर्ग आला. वैतरणा नदीकिनारी असल्याने ऐतिहासिक काळांत नदीमार्गे होणाऱ्या व्यापारावर आणि जवळपासच्या गावांवर वचक ठेवण्यासाठी या गड ताब्यात असणे महत्वाचे होते.

पहाटे ६ वाजता सूर्यनारायणाच्या आगमनासाठी सर्वांनी हजेरी लावली. वैतरणा आणि सूर्या नदीच्या संगमापलीकडच्या डोंगराआडून सूर्यनारायण दिमाखात अवतीर्ण झाले. जो देखावा लहानपणी आपण चित्रात काढत होतो, तो प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहण्यास मिळाला. या देखाव्यास साथसंगत होती ती पक्ष्यांच्या गुंजरावांची, झुळझुळणाऱ्या वाऱ्याची आणि दूरवरून येणाऱ्या मोरांच्या आवाजाची. समोर दूरवर दिसणाऱ्या दृश्याने डोळे आणि निसर्गाच्या या नाद संगीताने कान अगदी तृप्त झाले.

सूर्योदयाआधी वैतरणा नदीच्या आजूबाजूस पहुडलेला अभ्राच्छादीत निसर्ग 

सूर्यनारायणाच्या आगमनासाठी आसुसलेले ट्रेकर्स 

लहानपणी निसर्ग देखाव्याचे असेच चित्र काढायचो 




गडावरून पहाटे अनुभवलेली दृश्ये 

गडावरील वास्तू व वाटा 

मनात सारा फ्रेशनेस भरून छोटेखानी गड-दर्शन करून आलो. येईपर्यंत चुलीवरील चहा छान उकळला होता. चहाचे घोट घेत साऱ्यांनी आपापल्या परीने फोटोसेशन करून घेतले.
टेन्ट व सामानाची आवराआवर करून आपल्या तुकडीने गडउतारास प्रारंभ केला.  सकाळची वेळ आणि उत्साहीपणा असल्यामुळे ठरलेल्या वेळेआधीच आम्ही गड उतरून दिलीपभाऊंच्या घराकडे पोहोचलो. त्यांनी केलेल्या मदतीचे आभार मानून त्यांचा निरोप घेतला. गावाबाहेर पाटीलदादांची गाडी वाट बघतच होती. त्यातून त्यांच्या ५ मिनिटांत आम्ही सफाळे स्टेशनला पोहोचलो आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे ठीक १२ ची लोकल पकडून आपापल्या घरी!

जड सामान असले तरी माथ्यावरील कॅम्पिंगसाठी खुणावणारा, खडतर ट्रेकदरम्यान काजव्यांची साथसंगत देणारा, पहाटेचे अप्रतिम दृश्य पाहायला व ऐकायला लावणारा आणि जेवणात चुलीवरील बार्बेक्यू खाण्याचा अभूतपूर्व आनंद देणारा तांदुळवाडीचा हा ट्रेक खरोखरच छोटा पॅकेट बडा धमाका निघाला!!!





Tags: Tandulwadi, camping near mumbai, Safale, vaitarana.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साद सह्याद्रीची... निसर्गाची

कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 1) ....

उत्तनच्या किनाऱ्यावर...