भीमाशंकरायण

ही सफर सह्याद्रीतल्या सर्वांत मोठ्या खजिन्याची आहे. जवळपास २००६-०७ सालातील. त्यावेळी आत्तासारखे  व्यावसायिक ट्रेकिंगचे पेव  फुटले नव्हते. स्मार्टफोन्स नसल्यामुळे फोटोपुरते ट्रेकिंग होत नव्हते. गर्दी बिलकुल नव्हती. त्यामुळे व्यवस्थित आणि आहे त्या रूपात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येत होता. ह्या ट्रेकनंतर लगेचच कॉलेजच्या ANNUAL MAGAZINE साठी केलेलं हे शब्दांकन.

जुलै महिना उजाडला. यंदाची पावसाळी ट्रेकिंग नक्की झाली आणि भीमाशंकरला येण्यासाठी आम्ही बस्ता तयार केला. भीमाशंकर म्हणजे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील ट्रेकिंग प्रेमींचा आवडता ट्रेक पॉईंट. धार्मिकदृष्टया एक तीर्थक्षेत्र. आपल्या देशातल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग. भीमासारख्या पवित्र नदीचे उगमस्थान. तर वैज्ञानिक, भौगोलिकदृष्ट्या जैविक विविधतेचे अतिशय महत्वाचे ठिकाण. घनदाट जंगलाने वेढलेले, उंच डोंगरावर वसलेले, अनेक ओढी-झरे असलेले हे निसर्गाचे माहेरघरच जणू!

असे बरेच दिवस वाचनात असलेले भीमाशंकर ट्रेकिंगच्या माध्यमातून भेट देण्याचा दिवस उजाडला. दादरवरून कर्जतला जाणारी शेवटची लोकल पकडली. पहाटे ठीक ३.१५ वाजता कर्जतला पोहोचलो. स्थानकावरच आराम करायचं ठरलं. इथून पुढे एसटीने खांडस या गावापर्यंत आणि पुढे भीमाशंकरपर्यंत पदभ्रमंती असा प्लॅन होता. पण कर्जत एसटी स्टॅण्डवर पोहोचल्यावर कळलं की खांडसला जाणारी एसटी केव्हाची बंद करण्यात आली आहे. आमच्याप्रमाणेच अनेक तरुण-तरुणींचे घोळके भीमाशंकरला जाण्यास आले होते. त्यांचीही स्थिती आमच्यासारखीच होती. अखेरीस कशेळी या गावापर्यंत एसटी व पुढच्या प्रवासासाठी निर्वाणीची घासाघीस करून वडाप ठरविली. भाव करणारे आमचे २ मित्र जणू काय मोठं घबाड मारल्यासारखे छाती फुगवून आम्हाला सांगत होते.

जुलै महिन्याचा पहिलाच आठवडा असल्याने आणि वरुण राजाची महिनाभर दमदार हजेरी झाल्याने सर्वत्र निसर्ग खुशीत दिसत होता. हिरवेगार गालिचे पसरले होते. रस्त्याच्या दोन्ही कडेने झरे फुटल्यागत पाणी वाहत होतं. खूपच घासाघीस केल्याने वडाप चालकाने खांडस पासून २ किमी अगोदरच उतरविले. घासाघीस करणारे मित्र आता आमच्यापासून चेहरा लपविण्याची घासाघीस करत होते. परंतु, नुकताच सूर्योदय झाल्याने वातावरणातला फ्रेशनेस आमच्यात शिरला असावा आणि म्हणूनच त्या २ किमीने काय फरक पडणार म्हणून आम्ही चालायला सुरुवात केली. निसर्गाच्या गमतीजमती पाहायला मिळणार म्हणून खूप सारी उत्सुकता मनात आणि पदभ्रमंतीचा 'प्रचंड' उत्साह अंगात संचारला होता. डांबरी रस्त्यावरून पदभ्रमंती सुरु केली.

गावातून पलीकडे आल्याबरोबर सभोवतालचा निसर्ग नजरेच्या टप्प्यात येऊ लागला. आजूबाजूची शेती, त्यात डौलाने मिरवणारी छोटी छोटी पिकं, पक्ष्यांचा किलबिलाट, मध्येच येणारी वाऱ्याची चाहूल मन प्रसन्न करीत होती. रस्त्याने एक वळण घेतलं, आणि समोरचे भले मोठे डोंगर, त्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पांढऱ्या रेषा दिसू लागल्या. ते सारं नजरेत साठवण्याचा प्रयत्न करीत असतानाच बाजूने वाहणाऱ्या मोठ्याशा ओढ्याचा जालनाद कानावर पडू लागला. डांबरी रस्त्याची सीमा संपवत तो आडवा जात होता. जणू काही निसर्गाच्या परिसीमेत डांबरी रस्त्याला मज्जाव होता. कारण त्यापुढेच होतं, भीमाशंकरच्या निसर्गाचं अवाढव्य साम्राज्य!!!


जवळच्या गावकरी काकांकडून भीमाशंकरला जाण्याच्या वातेबद्दल पुरेशी माहिती घेतली. गणेश घाट व शिडी घाट अशा २ वाटा मंदिरापर्यंत जातात. त्यांपैकी शिडी घाट ३ तासांचा, पण वाट दुर्गम आणि खडतर. गणेश घाट त्यामानाने बराच सोपा, पण ५ तासांचा. आमच्यातील बरेच जण नवखे असल्याने आम्ही गणेश घाटाने जायचे ठरविले. त्याआधी ओढ्याकाठी बसून थोडी पोटपूजा केली. ५ तास पुरेल इतका शिधा असल्याची खात्री करून पुढे निघालो.

मातीच्या कच्च्या रस्त्याचं रूपांतर आता अरुंद पायवाटेत झालं. थोड्याच वेळात ती पायवाट गर्द रानात शिरली. पुढे तर पायवाट अतिशय बिकट झाली. पावसात गवत, झुडुपे वाढल्याने वाटेचा अंदाज लावणं मुश्किल जात होतं. जवळपास दीड तासानंतर एका उंच कातळकड्याच्या पायथ्याशी आलो. कोणत्या बाजूस जायचं हेच कळेना. वाट चुकल्याचा साक्षात्कार झाला. तो कातळकडा म्हणजे वाट चुकल्याचा सिग्नल होता. थोडा विचार करून डोंगराला वळसा घालून जावं असं ठरलं. कातळकड्याच्या पुढे SLOPE असलेल्या भागावरून डोंगर चढणीला सुरुवात केली. या बाजूला संपूर्ण भुसभशीत माती होती आणि माणसाच्या उंचीएवढी रोपटी होती. वाट अशी मुळी नव्हतीच. इतक्यात जोराचा पाऊस सुरु झाला. डोंगरावरून येणारं पाणी मातीसकट आम्हालाही खाली ढकलू लागलं. असं वाटत होत, ज्या महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही चाललो होतो, त्याच महादेवाने आमची परीक्षा घ्यायची ठरवलंय आणि सुपरव्हिजनसाठी वरुण राजाची नियुक्ती केलीय. पण अशा परीक्षांना घाबरतंय कोण...? विंदांच्या "चुकलो दिशा तरीही, हुकले न श्रेय सारे..." या उक्तीप्रमाणे चालतच राहिलो.

एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर डोंगर माथ्यावर पोहोचलो. समोरच मुख्य पायवाट नजरेस पडली. त्याही पलीकडे नजर गेली, आणि दिसलं भीमाशंकरचं अजस्त्र रूप. म्हणजे आता जो डोंगर पार केला तो होता फक्त ट्रेलर होता, समोर तर संपूर्ण सिनेमा आमची वाट बघत होता. 
खरोखरच, कर्त्या विधात्याने वसुंधरा बनविताना आपल्या पदरातील अनेक रत्ने या भूमीला अर्पण केली आहेत, अशी जाणीव झाली आणि महाराष्ट्र भूमीत जन्मल्याचा अभिमान वाटला.


फार वेळ आराम न करता पुढे निघालो. तासाभरानं एका पठारावर आलो. समोरच THUMBS-UP च्या
आकाराचा एक सुळका गगनाला भिडला होता. त्याला पाहून भीमाशंकरचा संपूर्ण परिसर एक शिवलिंग असल्याचा भास होऊ लागला. इथेच न्याहारीची दुसरी शिदोरी उघडली. यथेच्छ खाऊन पुढे निघालो.



आता वाटेत अनेकजण भेटू लागले. ते सर्व परतीच्या प्रवासाचे ट्रेकर्स होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अजूनही ३ तासांची पदभ्रमंती बाकी होती.
वाट सोपी नव्हती, मागच्या डोंगरावरून पाहिलेल्या धबधब्यांचे अनेक ओढे आम्ही पार केले. हा प्रवास सोपा नव्हता, कारण ओढ्यातली वाट अशी होती की पुढे १०-१५ फुटांवरच त्या ओढ्यांचे रूपांतर धबधब्यांत होई, तेही ८००-९०० फुटांवरील जमिनीचा वेध घेण्यासाठीच. पण एकमेकांच्या साहाय्याने आम्ही निसर्गाची सारी आव्हाने पार केली.

पुढे जिथे गणेश घाट व शिडी घाट एकत्र येतात, तिथे पोहाचलो. एका झोपडीवजा टपरीत ६५ वर्षांचे आजोबा बहुधा आमचीच वाट पाहत होते. त्यांच्याकडचा चहा पिऊन मस्त तरतरीत झालो, सोबत पोतडीत असलेला काहीसा खाऊही रिचवला. 
ट्रेकिंगचा पुढचा टप्पा घनदाट अरण्यातून जात होता. इथले उंचच उंच वृक्ष सूर्यप्रकाशालाही मनाई करत होते, तिथे सामान्य मनुष्याचं काय? पण आम्ही सावध होतो. मिळालेल्या माहितीनुसार याच जंगलात दुर्मिळ असा शेकरू नावाचा प्राणी (मोट्ठी खार) आढळून येतो, भाग्यवान असाल तर एखादा बिबट्या किंवा अस्वलही दर्शन देतो. परंतु आमच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही.



पुढे जंगल संपून पुन्हा एकदा डोंगराचा चढ सुरु झाला. इथली पायवाट वेली व झाडा-झुडुपांमुळे झाकून गेली होती. काही ठिकाणी तर आपल्याकडच्या बगिच्यांमध्ये जशा वेलींच्या कमानी असतात, तशाच गुंतागुंतीच्या कमानी तयार झाल्या होत्या. त्या गुडघ्यावर बसून पार करताना चांगलीच कसरत झाली.
बरंच चढण चढल्यावर पोटात कावळ्यांची शाळा भरली. कोणाच्याच बॅगेत खाण्याचे जिन्नस उरले नव्हते. आणखी दोघा-तिघांची हीच अवस्था झाली होती. पोटात काहीतरी इंधन भरल्याशिवाय शरीराचं यंत्र हवं तसं चालणार नाही याची पूर्ण जाणीव होती.  इतरांना पुढे पाठवून आम्ही थोडा वेळ थांबलो. इतक्यात सॅकमध्ये कांदे असल्याची आठवण झाली. कांदे कापून त्यावर मीठ-मसाला टाकला आणि आहा... चविष्ट आहार तयार!!! कित्येक वर्षांपूर्वी शिवरायांच्या मावळ्यांनी कांदा-भाकर खाऊनच अनेक किल्ले सर केले होते, तोच कांदा आमच्या मदतीला आला आणि आमच्या सेनेने भीमाशंकर नामक महाकिल्ल्याकडे कूच केले.

डोंगराचा कठीण चढ संपवून माथ्यावर येऊन पोहोचलो आणि ढगांवर स्वार झाल्यासारखे वाटू लागले. वाऱ्याची हलकी झुळूक आली आणि क्षणार्धात ढग अदृश्य होऊन पुन्हा अवतरले. तेव्हा कळलं की आपण दाट धुक्यात आहोत. धुकं इतकं दाट होतं की मी स्वतःच्या पायावर चालतोय हे दिसणं सुद्धा मुश्किल होतं. १० मिनिटांतच आम्ही भीमाशंकर गावात प्रवेश केला. गावावर सुद्धा दाट धुक्याची चादर पसरली होती. थंडी तर अंगाला बोचत होती.

गावातील सर्व घरं लहानच होती. बहुतेक घरांमध्ये ट्रेकर्सनी आपली पथारी पसरवली होती. आम्हीही एका छोट्याशा घराचा आसरा घेतला. घरात शिरल्या शिरल्या समोरच असलेल्या चुलीवर शेकोटी घेण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली. त्यावेळी दुपारचे दोन वाजले होते.

पटापट फ्रेश होऊन मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. मंदिरात शिरताचक्षणी प्रसन्न वाटलं. म्हटलं, याचसाठी केला होता अट्टहास... महादेवाच्या शिवपिंडीचं (ज्योतिर्लिंगाचं) मन भरून दर्शन घेतलं.



पुन्हा 'बुक' केलेल्या घराकडे वळलो. 'स्पेशल थाली' असं नाव जरी नसलं तरी त्या छोट्याशा  घरातल्या काकूंनी आमच्यासाठी बनवलेलं ते घरगुती जेवण अतिशय रुचकर होतं. चुलीवरची गरमागरम भाकरी खायला तर आम्हां पोरांची हमरातुमरी होत होती. जेवण झाल्यावर अनेकांनी आराम करणं पसंत केलं, तर माझ्यासहीत आणखी दोघांनी आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात वेळ घालवण्याचं ठरवलं.

संध्याकाळी ६ वाजता चुलीवरील फक्कड चहा पिऊन आम्ही बॅगा आवरल्या. त्या माउलीचे आभार मानून गावाकडील वरच्या बाजूस असलेल्या भीमाशंकर बस डेपोत आलो. जायची काहीच प्लँनिंग नव्हती, त्यामुळे हा प्रवासही अगदी मजेशीर आणि न विसरताजोगा झाला. इथून संध्याकाळच्या वेळेस मुंबईस जाणारी कोणतीच एसटी उपलब्ध नव्हती, म्हणून मग ६.३० वाजताची चाकणला जाणारी एसटी पकडून मंचरला उतरलो. तिथून मात्र मुंबईला जाणारी वाहतूक बराच वेळ काही सापडेना. अखेरीस सिमेंटचे ब्लॉक्स नेणारा एक ट्रक कुर्ल्यापर्यंत सोडण्यास तयार झाला. आठ पैकी आम्हां सहा जणांना मात्र ट्रकच्या सामान असलेल्या भागांत सिमेंटच्या ब्लॉक्सवर बसावे लागले. त्या उघड्या ट्रकमधून रात्रीच्या थंडीतून कुडकुडत केलेला प्रवास आठवला कि अजूनही अंगावर शहारे येतात.

पहाटे ५ च्या आसपास कुर्ला आणि नंतर लोकल पकडून FULL PIECE मध्ये घरी पोहोचलो तेव्हा सकाळचे ७ वाजले होते. दोन रात्री जवळपास पूर्णपणे जागून केलेली ही सफर, अर्ध्यापेक्षा जास्त दिवसभराचा ट्रेक, हरवलेला रस्ता, आडवाटेचा कठीण डोंगर चढतानाच आलेला पाऊस, मातीत रुतणारे पाय, मध्येच संपलेला शिधा अन कांदा खाऊन पूर्ण केलेला ट्रेक, बोचऱ्या थंडीत आणि दाट धुक्यात गाठलेला भीमाशंकरचा माथा, परतताना  उघड्या ट्रकमधून कुडकुडत केलेला प्रवास या सगळ्यातुन सुखरूप घरी आलो म्हणून आमची आरती ओवाळायचीच बाकी होती.

पुन्हा एकदा सांगावेसे वाटते, हा अनुभव जवळपास १४ वर्षांपूर्वीचा आहे. आता त्या निसर्गात थोडा फार बदल नक्कीच झाला असेल. पण सर्वाधिक फरक पडलेला आहे तो तिथे भेट देणाऱ्या लोकांमध्ये आणि त्यांच्या असलेल्या मानसिकतेमध्ये. काहीच वर्षांपूर्वी कळसूबाईला भेट देताना हे प्रकर्षाने जाणवले, 'आधुनिक तरुणांचा' भरणा असलेली बाजारबुणग्यांची जत्रा होती ती. असो, त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

तर... रामायण जसं अनेक चमत्कारांनी घडलं होतं अगदी तसंच, कसरतींनी व करामतींनी घडलेलं आमचं...   भीमाशंकरायण!!!



Tags: Bheemashankar, Khandas, Karjat, Ganesh ghat, shidi ghat, Shekru, Jyotirling, Mahadeo

टिप्पण्या

  1. नेहमी प्रमाणेच रसभरीत वर्णन ब्लाॕग वाचताना इतकी मजा आली तर ट्रेकला किती आली असेल? या पावसाळ्यात आपण करूया हा ट्रेक.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर आणि आनंददायी प्रवासवर्णन आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साद सह्याद्रीची... निसर्गाची

कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 1) ....

उत्तनच्या किनाऱ्यावर...