कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 2) ....

आजवर कोणतेच मिशन अर्धवट केलेलं नाही. काही ना काही मार्ग निघतोच. याच आव्हानांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्याचा उपयोग खऱ्या आयुष्यात, प्रोफेशनल आयुष्यात बऱ्याच वेळा झाला. आता पुन्हा तीच वेळ येऊन धडकली होती. निर्णय घ्यायचा होता. चढणीवर बाईक घालण्यात अर्थ नव्हता. साहस करावे, मूर्खपणा करू नये. याच मूर्खपणा पायी अनेकांनी नाहक जीव गमावले आणि आमचे अनेक डोंगर, किल्ले उगाच बदनाम झाले आहेत.  

आलो तीच TECHNIQUE  वापरून चिखलवाट पार केली. रस्त्याकडेला पहिलं घर लागेल तिथे विचारपूस करायचं ठरलं. काहीच अंतरावर २ गावकरी दिसले आणि हायसं वाटलं. विचारपूस केल्यावर कळलं की जिथे आम्ही उभे होतो तिथूनच सागरगडचा ट्रेक सुरु होतो. परंतु, बाईक लावायला योग्य जागा बघा अन्यथा पेट्रोल चोरी होईल असं बोलून ते गडाच्या दिशेने निघाले. आता पुन्हा एक पंचाईत. अखेरीस पुढे कुंपणाच्या आत एका घरात पराग आणि वेदांत चौकशी करण्यासाठी गेले, ते घरमालकाला घेऊनच सोबत आले. त्या काकांनी अगदी अदबीने कुंपणावरचे बांबू बाजूस करून आम्हाला व बाइक्सना घराच्या अंगणात थारा दिला. उरण पासूनची रपेट आणि दगडधोंड्यातून कसरत करून आमचे पार अवसान गळाले होते. आता पुन्हा ट्रेक करून गडावर जाऊन राहायची इच्छाशक्ती अगदी नसल्यागतच राहिली होती. त्यात त्या काकांनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी केलेल्या पाहुणचारामुळे आणि पाहिजे असेल तर इथे अंगणातच राहा आणि सकाळी गडावर जा म्हटल्यामुळे तिथेच राहायचा मोह आवरता येत नव्हता. परंतु, अशा मोहाला बळी पडेल तो ट्रेकर कसला... बाईक्स तिथेच लावून आणि काकांचा निरोप घेऊन आम्ही सागरगडाची वाट पकडली, तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. कोजागिरी रात्रीच्या टिपूर चांदण्यांत आमचा NIGHT TREK सुरु झाला. 

बोरिवलीपासून सागरगड पायथा रस्त्यामार्गे १०८ किमी आहे. रेवसची फेरी चालू असती तर अंतर आणि वेळेची बरीच बचत झाली असती. लवकर पोहोचलो असतो. असो, जर, तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नव्हता. WE ENJOYED OUR JOURNEY...

गडाच्या वाटेवर मधोमध एक मठ आहे, तिथल्या मंदिरांत आज रात्रीचा मुक्काम करायचा ठरवलं. कोजागिरीच्या निमित्ताने गावातला एक ग्रुप वर आला होता. त्यांनी जेवण बनवलं होतं. त्यात पायथ्याकडे भेटलेले २ गावकरीही होते, त्यांनी आम्हाला ओळखलं. इतकं हटकूनही हे चौघे वर आलेच हे बघून त्यांना नक्कीच आश्चर्य वाटलं असणार!  कोजागिरीच्या निमित्ताने त्यांच्या ग्रुपने बनवलेला बटाटावडा आमच्या हातात दिला. कसलीही टंगळमंगळ न करता बाजूच्याच देवळातली योग्य जागा अडवली. नक्की जाणून होतो, गावातली मंडळी गडावर आलीयेत म्हणजे देवळात येऊन झोपणार किंवा जागरण करणार. देवळातल्या यजमानांचे म्हणजे देवबाप्पाचे दर्शन करून हलकीशी पोटपूजा करून घेतली. एव्हाना १२ वाजून गेले होते. आता कोजागिरीच्या निमित्ताने आणलेले मसाला दूध प्यायची वेळ झाली होती. गडमाथ्यावर चंद्राच्या साक्षीने साजरी होणारी आमची कोजागिरी सागरगडावरील देवबाप्पाच्या साक्षीने साजरी झाली, ही सुद्धा आनंदाचीच बाब!

देवबाप्पाच्या साक्षीने साजरी केलेली मसाला दूध पार्टी 

रात्रभर झोप व्यवस्थित झालीच नाही. शेजारीच टवाळगिरी  करणाऱ्या, गाणी वाजवणाऱ्या गावकरी मुलांचा रात्रभर धुडगूस चालला होता. कदाचित त्यांच्यासाठी हाच NIGHTOUT ENJOYMENT असेल. त्यांना पहाटेच साथ मिळाली माकडांची. देवळाच्या छतावरून उड्या मारून माकडटोळीने पार बेजार करून टाकले. त्यामुळे अवेळीच झोप आवरती घ्यावी लागली.   फ्रेश होण्यासाठी विहिरीवर आलो, इथे आणखी एक मठ सदृश्य मंदिर आहे, त्याच्या बाजूने एक मोठा ओहोळ खळखळत डोंगर उताराकडे जातो. फार सुंदर वाटतो, हा परिसर. 

सर्व जामानिमा गोळा करून गड माथ्याकडे  निघालो. गड माथ्याकडे जाताना वाटेत २ आदिवासी पाडे लागतात. हेच ते सागरगड माची गाव. त्यापैकी एका घराकडे चहाची चौकशी केली. फक्त काळा चहा मिळेल, या अटीवर ती माऊली आत गेली. आणलेला थोडाफार शिधा खाऊन आणि गावातल्याच ३ मुलांना हाताशी धरून पुन्हा गड  माथ्याची वाट पकडली. रात्रीच्या ट्रेक मध्ये शरदाचं चांदणं अनुभवत होतो आणि आता गडावर ट्रेक करताना शरद ऋतूतलं कोवळं ऊन अंगावर झेलत होतो! सोबत हिरवागार निसर्ग होताच. जसजसं वरच्या बाजूस चढत होतो, तसं सागरगड आपली पानं उघडून दाखवू लागला. 

गडमाथ्यावर पोहोचल्याक्षणी बराचसा दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येऊ लागला. आजुबजुच्या परिसरावर दाटलेले धुके, त्यावरील दाट ढगांचे पुंजके  आणि ढगांच्याही वर दूरवर दिसणारे डोंगरमाथे एखाद्या FANTACY सिनेमातला देखावाच जणू!

शब्दांत वर्णन करताच येणार नाही असा निसर्ग देखावा... 

गडाचा माथा विस्तीर्ण आहे. येथे एका उंचवट्याला ४ मीटर उंचीची तटबंदी आणि बुरुज बांधून बालेकिल्ला बनवण्यात आला आहे. 

बालेकिल्ल्याचे अवशेष 

बालेकिल्ल्यात एक देऊळ आहे, ३-४ जणांची इथेही राहायची सोय होऊ शकते. मंदिराच्या खालच्या बाजूला कड्याच्या टोकाला पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील गोमुखातून नितळ पाण्याची संततधार पडत असते. 

देवळामागील कुंड व कुंडामध्ये गोमुखातून सतत पडणारे पाणी 


या कुंडाच्या पुढे किल्ल्याच्या २ सोंड २ बाजूला जातात. bird 's  eye view  घेतला तर हा डोंगरमाथा 'Y' आकाराचा आहे. या २ सोंडांपैकी उजव्या बाजूला एक समाधी आहे, डाव्या बाजूच्या सोंडेवर इंग्रजांनी बांधलेल्या विश्रामगृहाचे अवशेष आहेत. गडापासून सुटावलेला खुट्टा पिनॅकल अगदी समोरच दिसतो. 

खुट्टा पिनॅकल

गड माथ्यावरून पूर्वेकडे पाहिल्यास माणिकगड, कर्नाळा, मृगगड किल्ले नजरेत येतात. उत्तरेकडे धरमतर खाडी तर पश्चिमेकडे अलिबागचा समुद्र किनारा, रेवदंडा किल्ला नजरेच्या टप्प्यात येतात. यावरूनच या किल्ल्याचं भौगोलिक महत्व लक्षात येतं. त्याशिवाय बंदरातून, खाडीतून, किनारी प्रदेशातून होणारा व्यापार त्याहूनही महत्वाचा  आणि म्हणूनच या किल्ल्याचा ताबा आपल्याकडे राहावा म्हणूनच मध्ययुगीन राज्यकर्ते आग्रही असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या  ताब्यात असलेला हा किल्ला सन १६६० मध्ये जिंकून स्वराज्यात दाखल केला.

टोकावरून परत फिरताना वाटेत एक मोठं तळं लागतं. या तळाच्या वरच्या बाजूस छत्रपती शिवरायांची छोटेखानी मूर्ती स्थापन केली आहे. भारतीय नाविक आरमाराचे जनक असलेल्या या महापुरुषाचे जणू काही अजूनही या सागरगडावरून आजूबाजूच्या परिसरावर लक्ष आहे. 

१. इंग्रजांनी बांधलेल्या विश्रामगडाचे अवशेष,
२. तलावाबाजूने उंचवट्यावर वसवलेल्या शिवरायांच्या मूर्तीकडे जाणारी वाट,
३. तलाव (पावसामुळे गढूळलेलं पाणी)


शेर शिवराज 

मूर्तीसमोर उभं राहिल्याबरोबर ज्वलंत इतिहास नजरेसमोर तरळू लागतो आणि 'इंद्र जिमि जंभ परि' असणाऱ्या 'शेर शिवराज' पुढे मान आपसूकच नतमस्तक होते. गड फेरी पूर्ण करून पुन्हा सागरगडमाचीमधल्या माऊलीकडे विसावलो. पुन्हा एकदा काळ्या चहाचा आस्वाद घेऊन गड उतरायला सुरुवात केली. 

आपुलकीने चौकशी करणारी सागरगडमाची गावातली माउली 

सागरगडाच्या निसर्गाला आणखी एक वरदान लाभले आहे, ते म्हणजे 'धोंदने धबधबा'. अगोदर म्हटल्याप्रमाणे मठाशेजारून जो ओहोळ जातो, त्याचच रूपांतर पुढे धबधब्यात होतं. दोन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा म्हणजे इथल्या सृष्टी सौंदर्यावर चढवलेला साज आहे. इथला आनंद आपण घेऊ शकतो पण निसर्गाचा आदर राखत आणि स्वतःचा 'तोल' सांभाळतच.

सागरगडावरचा धबधबा 

पायथ्याशी उतरल्यावर बाईक्स लावलेल्या घराकडे आलो. काकांचा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला.    


सागरगडमाची गावातले हिरो  - आमचे गाईड्स 


------ भेटूया पुन्हा एकदा अशाच एका ऑफ-बीट सफारीसाठी. जॉईन करा  dwelling Sahyadri च्या ग्रुपला जर तुम्हालाही अशाच प्रवास, ट्रेक चा अनुभव घ्यायचा असेल तर. 


#sagargad
#maharashtra
#ट्रेक्स #treks #सागरगड  #sahyadri


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साद सह्याद्रीची... निसर्गाची

कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 1) ....

उत्तनच्या किनाऱ्यावर...