पालघर, बोईसर ही शहरे उद्योगांनी गजबजलेली; परंतु दुसऱ्या बाजूने नैसर्गिक समृद्धीने ल्यालेली आहेत. छोटेखानी असावा नावाचा किल्ला त्याच डोंगररांगेतील रत्न. काळदुर्ग आणि अशेरीगड यांच्या बरॊबर मधोमध बोईसर शहरावर नजर राखून असावा उभा आहे. फारसा परिचित नसला तरी इथला ट्रेक अगदी आल्हाददायक आहे. पालघरमधील सारेच किल्ले तसे दुर्लक्षित, पण प्राचीन काळी त्यांचे महत्व फार होते. सध्याच्या घडीला मुंबईपासून जवळच आणि तद्दन गर्दीपासून दूर असल्यामुळे एक दिवसाच्या ट्रेक साठी अतिउत्तम. यांच्या गडमाथ्यावरचे नजारे फारच सुंदर आहेत, दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.
लोकल ट्रेनमुळे बोईसरला पोहोचणे बरेच सोपे झाले आहे. बोईसर स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या बोईसर रिफ्रेशमेंटमध्ये नाष्टा आटोपून आम्ही सवारीच्या शोधात निघालो. सुदैवाने टमटमवाले एक काका त्याचवेळी वसईच्या दिशेने गाडीच्या काही कामासाठी निघाले होते. त्यांनी अगदी माफक दरांत गंतव्य स्थानी पोहोचवले. अन्यथा स्टेशनवरून टमटम वा हायवेच्या दिशेने जाणाऱ्या कोणत्याही ST ने वारंगडे गावांत उतरावे.
तिथे असलेल्या विराज फॅक्टरीच्या बाजूने असावाचा ट्रेक सुरु होतो. १० मिनिटांत आपण बारीपाडा गावात पोहोचतो. गावातल्यांशी तोंड ओळख करून उजव्या बाजूकडील ओहोळ ओलांडून आपण असावा डोंगराच्या राज्यात प्रवेश करतो.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातला ट्रेक असल्यामुळे वातावरण अगदी साजेसं होतं. भर पावसाळ्यातल्या दिवसांत सृष्टी नटून थटून सज्ज झालेली असते. याच दिवसांत निसर्गाची विविधांगी रूपे पाहण्यास मिळतात. निसर्गाच्या कुशीतील या ट्रेकला गर्द हिरवाईचे कोंदण लाभलेले असते.
 |
| हिरवा असावा |
 |
| गर्द हिरवाईतून जाणारा ट्रेक मार्ग |
पायवाटेला सोबत असणाऱ्या झऱ्यामुळे आणि सतत वाहणाऱ्या हळूशार हवेमुळे आपल्या शहरी शरीराला आणि मनाला नवचैतन्य लाभत असतं. ट्रेकच्या मधल्या टप्प्यावर पोहोचल्यावर हिरवाईची शाल पांघरलेला निसर्ग आपल्या स्वागतासाठी सज्ज असतो. या रंगामध्ये इतकी शीतलता आहे की आत्तापर्यंत लॅपटॉपच्या स्क्रीनने सुकलेल्या डोळ्यांना हे दृश्य फारच सुखावह वाटतं. नजरेला, मनाला दिसणारी सुंदरता याहून काही वेगळी असते का...
 |
| हिरवाईची शाल पांघरलेला निसर्ग |
जवळपास दीड तासाने आपण गडमाथ्यावर पोहोचतो. शेवटची खडी चढाई चढताना दमछाक होते खरी, पण वर पोहोचताच समोर दिसणारा नजारा पाहून सारा उत्साह पुन्हा RECHARGE होऊन जातो. उत्साही मंडळींचे फोटो शूट करून झाल्यावर सर्वांचे टिफिन उघडले जातात. बऱ्यापैकी जिन्नसा पोटात ढकलल्यावर तरतरीत झालेल्यांना वेध लागतात गड दर्शनाचे.
 |
| गड-भोजन |
असावाचा इतिहास पालघरमधील इतर किल्ल्यांसारखाच. शूर्पारक, तारापूर, डहाणू या बंदरांत उतरणारा माल ज्या मार्गांनी राज्याच्या इतर भागांत जाई त्यातील बोईसरजवळच्या महत्वाच्या मार्गावर देखरेखीकरितां या किल्ल्याची बांधणी झाली. वसई किल्ले मोहिमेत इतर किल्ल्यांप्रमाणेच हा ही मराठ्यांनी आधीच हस्तगत करून फिरंग्यांची नाकेबंदी केली.
 |
| किल्ल्यावरून अगदी दूरवरच्या प्रदेशापर्यंत नजर ठेवली जात असे. |
परंतु, असावाला भेट देण्यामागचा हेतू हा इतिहासापेक्षा अधिक त्याची स्थापत्य योजना पाहण्यात आहे. ह्या डोंगरी किल्ल्यांवर पाण्याची कमतरता. त्यामुळे ती भरून काढण्यासाठी जी योजना राबविली आहे, ती खरॊखरच आजच्या तंत्रज्ञांनी आत्मसात करण्यासारखी आहे.
डोंगराच्या माथ्यावर कातळांत अनेक बाजूंस चर खोदलेले आहेत, त्यांच्या मार्गावर एकेक फुटाचे अनेक वर्तुळाकार खड्डे केलेले आहेत. जेणेकरून पावसाचे पाणी या चार मार्गाने जात, त्यावेळी गाळ या खड्ड्यांमध्ये जमा होई व फक्त पाणी पुढे निघून जाई. हे स्वच्छ पाणी पुढे गडाच्या दक्षिण टोकाला असलेल्या ५० फूट लांब व २० फूट खोल असलेल्या मोठ्या टाकीत जमा होई. अशीच योजना गडावरील इतर २ पण त्यामानाने लहान टाक्यांमध्ये केलेली आढळते. यालाच जलसंधारण म्हणजे समजण्याच्या भाषेत RAINWATER HARVESTING असं म्हणतात. पाणी मिळाले तेही स्वच्छ. काय म्हणावे या अजोड कल्पकृतीला. आपल्या पूर्वजांचे आभार मानावे तितके कमी. याच डोंगरांईतके त्यांचे कार्यही किती अफाट होते.
 |
| पाण्यातील गाळ या एक फूट खड्ड्यांमध्ये जमा होऊन वरील नितळ पाणी टाक्यांमध्ये जात असे |
 |
| गडाच्या दक्षिण टोकाला असलेलं मोठं टाकं |
 |
| गडावरील आणखी टांक्या |
गड दर्शनांत पुढे पहारेकऱ्यांसाठी ताशीव दगडांनी बांधलेल्या देवड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. आम्ही गेलो त्यावेळी 'बा रायगड' संस्थेचे सदस्य वृक्षरोपणासाठी (बीजारोपण) गडावर आले होते. त्यांच्यासोबतीने आम्हीही गडाच्या बऱ्याच भागांत खड्डे खोदून झाडांच्या बिया लावण्यास त्यांना सहाय्य केले. ट्रेकच्या माध्यमातून आणखी एक सुंदर काम केल्याचं समाधान!
 |
| वृक्षारोपणास साहाय्य करणारी आपली एक ट्रेकर सदस्य |
किल्ल्याच्या खालच्या बाजूस असलेल्या प्रचंड गुंफेचे दर्शन घेऊन आपली गड फेरी संपते आणि परतीचा प्रवास सुरु होतो. पावसाचे दिवस असल्याने गड उतरताना निसरड्या वाटेवरून खूप सांभाळून उतरावे लागत होते.
 |
| निसरड्या वाटेवरून अगदी काळजीपूर्वक उतरताना... |
ट्रेकने दमलेल्यांस ट्रेनमध्ये बसायला मिळेलच याची काही खात्री देता येत नाही. पण तरीही त्या दरम्यान आपल्याला जाणवते की या ट्रेकमध्ये बरेच काही शिकायला मिळाले. निसर्गाच्या अव्याहत चालणाऱ्या कार्यापुढे आपण फारच तोकडे आहोत आणि पूर्वजांच्या प्राचीन प्रगतीतून खूप काही शिकायचे आहे.
विचारांची व फोटोजची देवाणघेवाण करता करता आपण घरी तर पोहोचतो पण मनांत मात्र गडावरील बांधकाम, पाहिलेला नजारा आणि गड संवर्धनासाठी झटणारी मंडळी कायम स्मरणांत राहतात. हाच तर या ट्रेकमध्ये मिळालेला सुंदर असा अनुभवाचा नजराणा. म्हणूनच म्हणावेसे वाटते, 'असावा' सुंदर....
Tags: Asawa, Boisar,
khup sunder asech lihit raha...all the best
उत्तर द्याहटवा