मुंबई, ठाण्यातल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनांतून काहीसा विरंगुळ्याचा, निवांत क्षण काढायचा असेल तर प्रसिद्ध आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा जवळच्याच आणि त्याहीपेक्षा सुंदर ठिकाणी जायला कोणाला आवडणार नाही, त्यातही काही नवे अनुभवायला मिळत असेल तर...
कोकणांतल्या इतर जिल्ह्याप्रमाणेच पालघर जिल्हा सुद्धा निसर्गाच्या आशीर्वादाने भरपूर पावेता झालेला आहे. हिरे माणके पेरावेत, त्याप्रमाणे निसर्गाचं कोंदण या जिल्ह्याला लाभलं आहे. एका बाजूला मोठमोठाले डोंगर, वळणदार नद्या, छोटछोटी गावं, आदिवासी पाडे, जंगलांचा भाग तर दुसऱ्या बाजूला समुद्राची गाज.
निसर्गाच्या भौगोलिक देणगीमुळेच भारतातला पहिला आण्विक ऊर्जा प्रकल्प पालघरमधील तारापूर मध्ये स्थापित झाला. सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असा नामाभिमान मिरवणारी तारापूर MIDC ही सुद्धा इथलीच.
पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम लोकल यामुळे इथला प्रवास बऱ्यापैकी सोपा झाला आहे. मुंबईला लागूनच असल्यामुळे अलीकडच्या काळात अतिशय झपाट्याने इथल्या बऱ्याचशा भागांचे नागरिकीकरण झाले. वसई-विरार भागांत लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली आणि शहरीकरण आता पार पालघर, उमरोली, बोईसर पर्यंत पोहोचलं आहे. असे असतानाही पालघर जिल्ह्याने निसर्गातला जिवंतपणा टिकवून ठेवला आहे.
हाच निसर्ग अनेक प्रेक्षणीय स्थळांना (नैसर्गिक व ऐतिहासिक) आपल्या अंगा-खांद्यावर बाळगून आहे. तुंगारेश्वराच्या जंगलापासून सुरु होणारी त्याची सद्दी पार डहाणू-घोलवडच्या चिकूंच्या बनांत घेऊन जाते, वसईच्या खाडीचे पाणी बेमालूमपणे बोर्डीच्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाते, समुद्री व डोंगरी किल्ले गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतात; त्यासोबतच आडवाटेवरचे जव्हार, दाभोसा, सूर्यमाळ, वाडा, मोखाडा OFFBEAT निसर्गाचं आणि लोक-संस्कृतीचं दर्शन घडवितात.
|
(१) कोहोज, (२) तांदुळवाडीवरून दिसणारा वैतरणाचा वळणदार प्रवास,
(३) जव्हारमधील एक गाव, (४) केळवेचा समुद्रकिनारा
|
इथली धर्मस्थळेही अशीच प्रसिद्ध. एका दिवसांत धार्मिक यात्रा म्हणून भेट देण्यासारखी.
मग ते घनदाट अरण्यातलं तुंगारेश्वर मंदीर असो, उंच डोंगरावरील जीवदानी मंदीर असो वा पार डहाणूचं महालक्ष्मी मंदीर असो भाविकांची गर्दी नित्याचीच. त्याशिवाय, वज्रेश्वरी व गणेशपुरी येथील मंदीरं व गरम पाण्याची कुंड ही सुद्धा अशीच भक्त आणि हौशी मंडळींची आवडती ठिकाणं.
|
(१) डहाणूचं महालक्ष्मी मंदीर, (२) जीवदानी मंदीर,
(३) तुंगारेश्वर मंदिर, (४) गणेशपुरी मंदीर व गरम पाण्याची कुंडं |
वसई, सोपारा मधील CHURCHES दर रविवारी ख्रिस्ती बांधवांनी फुललेले असतात. नाताळ व ईस्टरच्या दिवसांत तर या साऱ्या परिसरांस उत्सवाचे स्वरूप आलेले असते. नाला सोपारा हे ऐतिहासिक काळात बौद्ध व जैन धर्मियांचे तीर्थस्थळ होते.
|
(१) सोपाऱ्यातील निर्मळ येथील चर्च, (२) नाला सोपारामधील गौतम बुद्धांची ध्यानमग्न मूर्ती, (३) नाताळात मिरवणूक, (४) नाताळसाठी सजविलेले वसईतील एक चर्च |
येथील निसर्गाला आणखी सोबत मिळालीय ती ऐतिहासिक समृद्धीची. पूर्वी म्हणजे आजपासून जवळपास २६०० वर्षांपासुन भारतीयांचा तत्कालीन परदेशी राज्यांसोबत (इजिप्त, ग्रीस, ई.) व्यापार चालत असे. तो सारा माल शूर्पारक (आजचे नाला सोपारा) बंदरांतून जहाजांत चढवला जाई. अनेक परदेशी प्रवासी देखील या बंदरांत उतरून पुढे भारतभर भ्रमण करत असत. मौर्य सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा याच बंदरांतून श्रीलंकेला बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी गेले होते.
त्याच काळांत एक बौद्ध स्तूप इथे बांधण्यांत आला होता. त्याचे अवशेष आजही इथे पाहण्यांस मिळतात. इतक्या गजबजलेल्या शहरांतला हा भाग मात्र कमालीचा शांत आणि प्रसन्नकारक आहे.
|
अतिप्राचीन शूर्पारक स्तूप |
इथून जवळच असलेल्या चक्रेश्वर तलावाजवळील महादेव मंदिराबाहेर अनेक पुरातन मुर्त्या ठेवलेल्या दिसतात. हिंदू, बौद्ध, जैन धर्मासंबंधित असणाऱ्या ह्या मुर्त्या हजारो वर्षांचा इतिहास कथन करतात.
|
चक्रेश्वर मंदीराजवळील मुर्त्या |
आपली समुद्र व किनारी प्रदेशांतील सत्ता बळकट व मजबूत करावी म्हणून पोर्तुगीजांनी येथे अनेक छोटे-मोठे किल्ले बांधले. समुद्र व खाडीच्या मुखाशी असलेला वसईचा बुलंद किल्ला हा पोर्तुगीजांच्या सत्तेचा केंद्रबिंदू होता. हा किल्ला पूर्ण पाहण्यासाठी आणि तो किल्ला जिंकण्यासाठी चिमाजी अप्पांनी आखलेली STRATEGY समजून घेण्यासाठी एक पूर्ण दिवसही अपुरा पडेल.
छोट्याशा होडीतून अर्नाळा किल्ला पाहणे थोडे धाडसाचे असले तरी किल्ल्यांच्या तटबंदीत अडकलेले तोफगोळे पाहताना आणि संपूर्ण किल्ला फिरताना येथील भेटीची महत्ता कळून येते.
|
वसई किल्ला |
केळवे बीचवर असलेला छोटेखानी किल्ला, बाजूच्या टेकडीवरील भवानगड, लोकवस्ती व झाडाच्या फांद्यांमध्ये उरलेला दांडा किल्ला (किंबहुना अवशेष), फक्त ओहोटीच्या वेळीसच भेट देता येईल असा पाणबुडी आकाराचा केळवे पाणकोट या साऱ्यांची एका दिवसांतली OFFBEAT सफर खूप छान होते आणि सोबत पोर्तुगीजांची समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची रणनीती कशी होती, हे समजायला मदत करते. या सफरीदरम्यान अस्सल समुद्री मेवा म्हणजे मासे खायची मज्जा काही निराळीच असते.
|
(१) टेकडीवरील भवानगड, (२) ओहोटीच्या वेळीच पाहता येईल असा केळवे पाणकोट,
(३) दांडा किल्ल्याचे अवशेष, (४) अर्धा-अधिक वाळूत गडप झालेला बीच वरील केळवे किल्ला. |
राजा भीमदेवाने राजधानीचे बनविलेले माहीम-शिरगांव आणि तेथील सुंदर बांधणीचे किल्ले आज पडीक अवस्थेत असले तरी त्यांची विशिष्ट वास्तुरचना लक्ष वेधून घेते.
|
वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचा माहीमचा किल्ला,
माहीम-शिरगाव वाटेवरील शंकर मंदीर |
|
पालघरचा मानबिंदू शिरगाव किल्ला |
|
अनेक फांद्या असलेले माडसदृश्य झाड, दूरवर दिसणारा समुद्र किनारा
|
शूर्पारक बंदरांत उतरणारा माल ज्या मार्गांनी देशांतल्या शहरांत जाई, त्या मार्गांवर चौकी-पहारे बसविणे गरजेचे होई. म्हणूनच कालांतराने पालघर पूर्वेकडील डोंगरांवर अनेक किल्ले उभे राहिले. बहुतेक शिलाहारकालीन असणारे हे किल्ले नंतर गुजरातच्या सुलतानाकडून पोर्तुगीजांनीं हस्तगत केले. मात्र वसई मोहिमेदरम्यान मराठ्यांनी एकेक करत सारे किल्ले कसे काबीज केले ते समजण्यासाठी ही किल्ले सफर करायलाच हवी. वसईच्या कामनपासून टकमक, तांदुळवाडी, कोहोज, काळदुर्ग, असावा, अशेरी अशी पालघरपर्यंत शृंखलाच आहे ती पार गुजरातच्या सीमेपर्यंत असणाऱ्या गंभीरगड, बल्लाळगड, सेगवा किल्ल्यांपर्यंत.
|
१) आजही व्यापारी महत्वाचा असलेल्या अहमदाबाद हायवेवर नजर ठेवणारा अशेरीगड,
(२) काळदुर्गचा बालेकिल्ला आणि पलीकडे नजरेच्या टप्प्यात बोईसर शहर,
(३) वैतरणा नदीवर नजर ठेवणारा तांदुळवाडी किल्ला, (४) वसई- भिवंडी मधील कामनदुर्ग. |
दिसायला छोटेखानी वाटले तरी इथे ट्रेक करणे साधे सोपे काम नोहे! त्यामुळे कधी कधी किल्ल्यांच्या माथ्यावर कॅम्पिंगचाही बेत आखला जातो. कॅम्पिंगमध्ये जेवणाचा बेत करणं, टेन्ट मध्ये झोपणं आणि पहाटे उगवत्या सूर्याचं फोटोशूट करणं म्हणजे एक आनंद सोहळाच!
|
तांदुळवाडी किल्ल्यावरील कॅम्पिंगची क्षणचित्रे |
पालघरच्या अति-पूर्वेकडे असणारे जव्हार निसर्गसंपन्नतेसोबत इतिहास समृद्धही आहे. १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करण्यास जव्हारमार्गे निघाले असताना येथील विक्रमशाहराजे यांनी महाराजांची भेट घेऊन त्यांस मानाचा शिरपेच दिला होता. ज्या ठिकाणी ही भेट झाली, ती जागा स्मारक स्वरूपात पाहता येते. त्याशिवाय, हिंदी सिनेमात दाखवला जाणारा जव्हारचा राजवाडाही इथल्या सफरीत पाहता येतो.
|
(१) जव्हार राजवाडा, (२) शिरपामाळ स्मारक |
जव्हार परिसराची एक दिवसाची भेट ही निसर्ग, इतिहास, लोक-संस्कृती आणि कला ह्यांचा सुरेख संगम घडवून आणते. मान्सून व त्यानंतर इथला निसर्ग सुंदरतेने भरलेला असतो. हिरवाईचा साज, निळ्याशार पाण्याचे जलाशय, धबधबे पाहताना मन हरखून जाते. दाभोसाचा धबधबा आणि जलाशय पाहून तर डोळ्याचं पारणं फेडतं, इतका अप्रतिम नजारा असतो.
|
(१) जानेवारी महिन्यामध्ये निळ्याशार जलाशयाचा दाभोसा, (२) ऐन पावसाळ्यातील दाभोसा धबधबा,
(३) हनुमान पॉईंटवरून दिसणारा परिसर व जव्हार राजवाडा. |
जव्हार, मोखाडा, खोडाळा, वाडा, विक्रमगड येथील वारली, ठाकर या आदिवासी जमाती आजही आपली लोक-संस्कृती आणि कला टिकवून आहेत. आपल्या सफरीदरम्यान त्यांना भेट देणं आणि त्यांची जगण्याची पद्धत, संस्कृती समजून घेणं, म्हणजे आपली अनुभवाची शिदोरी पुरेपूर भरून घेण्यासारखं नाही का...
|
वारली चित्रकला व ठाकर लोकनृत्य |
आपल्या शहरापासून अगदी जवळ असल्यामुळे कंटाळा आला की अगदी सहजरित्या इथल्या स्थळांना भेट देऊन आपण पुन्हा फ्रेश होऊ शकतो. कोणत्याही मोसमांत पालघर जिल्हा आपल्याला निराश करत नाही. पावसाळ्यांत तर इथल्या बहरलेल्या निसर्गाला भेट देणं म्हणजे एक पर्वणीच. कोणत्याही दिवसांत इथले पेल्हार, तुंगारेश्वर, चिंचोटीसारखे छोटेखानी JUNGLE TRAILS करून आपण स्वतःला RECHARGE करू शकतो.
|
चिंचोटीच्या वाटेवरती - Jungle Trail |
त्याशिवाय, डोंगरी किल्ल्यांवर ट्रेकिंग, सुरुच्या बनांतले समुद्र किनारे व समुद्री किल्ले, निसर्ग सान्निध्यात धार्मिक सफर, शेती विषयक माहिती देणारी सफर (AGRO TOURISM), जव्हार भागांत निसर्ग सान्निध्यात आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारी सफर अशा एक ना अनेक सफरींसाठी आपण पालघरला भेट देऊ शकतो. खाद्यरसिकांनाही पालघर निराश करत नाही, इथली खाद्यसंस्कृती सुद्धा अशीच पुरेपूर... जिभेचे चोचले पुरवणारी आहे. किनारीभागांतल्या सागरी पदार्थांपासून ते आदिवासी पाड्यांतल्या रानमेव्यापर्यंत सारं काही इथे उपलब्ध आहे.
एकुणात काय तर, पालघरमधील पर्यटन म्हणजे एक प्रकारचं MINDFULNESS.... MEDITATION म्हणा हवं तर.
येथे एखादी भेटसुद्धा आपल्या धकाधकीच्या जीवनामुळे दमलेल्या शरीराला नवसंजीवनी आणि मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देऊन जाईल.
Tags: Palghar, jawhar, asherigad, kelve, dabhosa, shurparak, kelve.
खूपच सुंदर लेख लिहता तुम्ही....लेख वाचताना असे वाटते की खरंच तिथल्या निसर्गरम्य परिसराचा अनुभव एकदा तरी आवर्जून घेतला पाहिजे....😊
उत्तर द्याहटवाधन्यवाद. आम्ही पालघर भागात अनेक सफरी घेऊन जातो, तुम्हीही सहभागी व्हा, फार छान अनुभव मिळतो.
हटवाखुप छान अनुभव व्यक्त केले आहेत. अशीच माहिती देत रहा हे आमच्या साठी आणी पुढच्या पिडीसाठी खुप उपयोगाची ठरेल.
उत्तर द्याहटवाधन्यवाद. आपल्याला मिळालेला अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत सकारात्मक पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.
हटवा